मुंबई : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित 'संघर्षयात्रा' चित्रपटाला मुंडेंची कन्या, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोध केला आहे. मुंडे कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय चित्रपटाची निर्मिती केल्याचं पंकजा यांनी म्हटलं आहे.
पंकजा मुंडे यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना काही बदल सुचवले आहेत. बदलांनंतरच चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होणार आहे. चित्रपट ११ तारखेला प्रदर्शित होणार होता, मात्र काही कारणाने याचं प्रदर्शन पुढे ढकललं गेलं.
मराठीसह हिंदी मालिकांत गाजलेला अभिनेता शरद केळकर या चित्रपटात गोपीनाथ मुंडे यांची व्यक्तिरेखा साकारत आहे, तर श्रुती मराठेने यात पंकजा मुंडे यांची भूमिका केली आहे.
या चित्रपटात गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय कारकीर्दीसह कौटुंबिक जीवनावरही प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. शरद केळकर आणि श्रृती मराठेसह या सिनेमात ओमकार कर्वे याने प्रमोद महाजन यांची तर दिप्ती भागवतने प्रज्ञा मुंडे यांची भूमिका साकारली आहे. गिरीश परदेशी यात प्रविण महाजन यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
सिनेमातील खास बात म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पहिल्यांदाच चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं आहे.