मुंबई : विलेपार्ले येथील पारले-जी बिस्किटांचा कारखाना बंद करण्याचा निर्णय पारले-जी कंपनीने घेतला आहे. गेल्या ८७ वर्षांपासून येथील कारखान्यात बिस्किटे तयार करण्यात येत होती.
पारले-जी प्रकल्पाची उत्पादन क्षमता कमी असल्याने हा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कंपनीचे कार्यकारी संचालक अरुप चौहान यांनी दिली. गेल्या दोन महिन्यांपासून येथील पारले-जी बिस्किट उत्पादन थांबवण्यात आले आहे.
विलेपार्ले येथे १९२९ पासून पारले उत्पादनांच्या निर्मितीला सुरुवात झाली. सुरुवातीला फक्त कँडीजचे उत्पादन होत होते. मात्र त्यानंतर दहा वर्षांनी बिस्किटांची निर्मिती सुरु झाली. निल्सनच्या सर्व्हेनुसार पारले-जी जगातले सर्वाधिक विकले जाणारे बिस्किट आहे.
विलेपार्ले येथील पारलेच्या प्रकल्पात सध्या तीनशे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील बहुतांश कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.