सीमोल्लंघन करताना घ्या आपल्या पदार्थांचा 'आस्वाद'

मुंबई : तुम्ही देशाबाहेर जात असाल, पण जीभेवर अस्सल घरगुती पदार्थांचा 'आस्वाद' घेऊन सीमोल्लंघन करण्याची इच्छा असेल तर आता ते शक्य होणार आहे.

Updated: Mar 29, 2016, 04:01 PM IST
सीमोल्लंघन करताना घ्या आपल्या पदार्थांचा 'आस्वाद'

मुंबई : तुम्ही देशाबाहेर जात असाल, पण जीभेवर अस्सल घरगुती पदार्थांचा 'आस्वाद' घेऊन सीमोल्लंघन करण्याची इच्छा असेल तर आता ते शक्य होणार आहे. कारण, दादरच्या शिवाजी पार्क येथे असणाऱ्या आस्वाद उपहारगृहाची एक शाखा आता मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा टी-२ येथे उघडण्यात आली आहे. बोर्डिंग गेट ४९ ते ५३ च्या दरम्यान ही शाखा उघडण्यात आली आहे.

आस्वाद उपहारगृहाच्या मिसळ पावने गेल्याच वर्षी लंडनमधील 'फूडी हब गोल्डन अॅवॉर्ड'चा जगातील सुरुवात चवदार शाकाहारी पदार्थाचा पुरस्कार जिंकला होता. या मोठ्या गौरवानंतर आता मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर या उपहारगृहाची शाखा सुरू होणे, ही एक मोठी बाब म्हणायला हवी.

विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानतळावर शाखा उघडली असली तरी नावाची पाटी मात्र मराठीच ठेवण्यात आली आहे.

२७ वर्षांपूर्वी शिवाजी पार्कच्या जवळ शिवसेना भवनाच्या समोर आस्वादच्या प्रवासाला सुरुवात झाली. आता तर इथे दररोज अबालवृद्धांची गर्दी असते. काहीच दिवसांपूर्वी या उपहारगृहाने घाटकोपरमध्येही शाखा उघडली.

'विमानतळाचा कारभार पाहणाऱ्या जीव्हीके कंपनीने अल्पावधीत हे उपहारगृह तिथे सुरू करण्याचे आव्हान होते. आता, मात्र लोक विमानतळावरही महाराष्ट्रीय पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात,' असं उपहारगृहाचे मालक सूर्यकांत सरजोशी यांनी 'डीएनए' वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.

आता विमानतळावर पदार्थ विकले जाणार म्हणजे साहजिकच त्यात वापरलेल्या जिन्नसांची गुणवत्ता वाढवली जाणार आहे. इथे पदार्थांची विक्री करण्यासाठी उपहारगृहांतर्फे विशेष व्यक्तींची वाढीव वेतनावर नियुक्ती करण्यात आली आहे. असं असलं तरी पदार्थांची चव मात्र अजिबात बदललेली नाही, अशी प्रतिक्रिया या शाखेला भेट दिलेल्या प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

'आमची शाखा कुठेही नाही' हे सांगण्यात मराठी माणसाला खरं तर नको तेवढा अभिमान वाटतो. पण, याच परंपरेला फाटा देत 'आमची शाखा इथेही आहे' हे सांगण्याचा नवा पायंडा 'आस्वाद'नं पाडलाय, असं म्हणायला आता हरकत नाही. मराठी पदार्थांना जागतिक पातळीवर प्रसिद्ध करण्याचा सरजोशींचा मानस आहे.