'संत-पुरुषांच्या कबरीजवळ महिलांनी जाणं हे घोर पाप'

'महिलांचं मुस्लीम संत पुरुषांच्या कबरीजवळ जाणं हे घोर पाप आहे' असं धक्कादायक मत आज 'हाजीअली ट्रस्ट'नं मुंबई हायकोर्टात नोंदवलंय.

Updated: Oct 20, 2015, 07:32 PM IST
'संत-पुरुषांच्या कबरीजवळ महिलांनी जाणं हे घोर पाप' title=
सौ. डीएनए

मुंबई : 'महिलांचं मुस्लीम संत पुरुषांच्या कबरीजवळ जाणं हे घोर पाप आहे' असं धक्कादायक मत आज 'हाजीअली ट्रस्ट'नं मुंबई हायकोर्टात नोंदवलंय.

'हाजीअली ट्रस्ट'नं दर्ग्यातील महिलांच्या प्रवेशबंदीचं समर्थन करताना हायकोर्टाला दिलेल्या उत्तरात हे मत नोंदवलंय. तसंच कबरीजवळ सतत बरीच गर्दी होत असल्यानं ती जागा महिलांसाठी तितकीशी सुरक्षित नसल्यामुळे पूर्वापार काळापासून महिलांसाठी वेगळी व्यवस्था ठेवण्यात आलीय, ज्याचं अनेक महिला भक्तांनी स्वागतच केलंय, असंही त्यांनी कोर्टासमोर म्हटलंय. 

याशिवाय 'हाजीअली ट्रस्ट' ही संविधानानं दिलेल्या अधिकारांनुसारच चालवली जात असून आम्ही आमची प्रकरणं सांभाळण्यास समर्थ आहोत, ज्यात इतर कुणाही ढवळाढवळ करू नये, असंही कोर्टाला बजावलंय.

नूरजहाँ नियाज आणि झाकिया सोमन या 'भारतीय मुस्लिम महिला आंदोलन संघटने'च्या कार्यकर्त्यांनी हायकोर्टात दर्ग्यातील कबरीजवळ महिलांच्या प्रवेशबंदी विरोधात जनहित याचिका दाखल केलीय. या याचिकेवर मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे. 

या संदर्भातील पुढील सुनावणी 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.