www.24taas.com, मुंबई
वांद्रे इथे ज्या तरुणीवर अॅसिड हल्ला झाला त्या प्रीती राठीनं एक पत्र लिहिलंय. तिची प्रकृती ठीक असली तरी तिनं चेहरा गमावलाय. प्रीतीनं लिहिलेल्या पत्रात तिची आर्त व्यथा मांडलीय.
‘मला आता सुंदर दिसायचं नाही...’ हे शब्द आहेत दुर्दैवी प्रिती राठीचे. पुढे ती या पत्रात म्हणते ‘निक्की आणि तन्नुचं रक्षण करा... माझ्याबरोबर जे झालं, ते त्यांच्याबरोबर होता कामा नये…’ शुक्रवारी वांद्रे टर्मिनसवर प्रीतीवर एका अज्ञात तरुणानं अॅसिड हल्ला केला. यामध्ये प्रितीचा डोळा आणि चेहऱ्याचा अर्धा भाग जळलाय. तिच्यावर ‘मसिना रुग्णालयात’ उपचार सुरु आहे. प्रीती संरक्षणदलात नर्स म्हणून रुजू होणार होती. लहानपणापासूनच संरक्षण दलात काम करण्याचं ध्येय असलेल्या प्रीतीला आपलं स्वप्न पूर्ण होणार का? याचीही आता काळजी आहे.
रेल्वे फलाटावर हा हल्ला झाल्याने रेल्वे प्रशासनाने तिच्यावरील उपचारांचा संपूर्ण खर्च सहानुभूतीपोटी उचलला आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने मुंबई हादरली. सुरक्षेबद्दल चर्चा झडल्या. पण पुढचा संघर्ष प्रीतीलाच करायचाय. या निष्पाप मुलीच्या चेहऱ्यावरचं सौंदर्य परत येईल कदाचित... पण भयानक विकृत हल्ल्याचा आघात सोसणाऱ्यांची मनं कणखर करणं खरंच कठिण काम आहे.