मुंबई : येरे येरे पावसा म्हणणाऱ्या मुंबईकरांना पावसानं १२ तासातच थांब रे म्हणायला लावलं. गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसानं देशाची आर्थिक राजधानी तुंबवून टाकली.
गुरुवारी रात्रीपासून पावसानं मुंबईकरांना करून दाखवलं. गुरुवारी रात्री सुरू झालेला पाऊस असा काही बरसला की मुंबईकरांचा विकेंड एक दिवस अगोदर सुरू झाला. वांद्रे, सायन, माटुंगा, विद्याविहार, हिंदमाता, मालाड परिसरात पाणी साचलं. पूर्व आणि पश्चिम उपनगरवासियांची तर अक्षरशः दैना उडाली.
वडाळा, माझगाव, माहिम, हिंदमाता परिसरात वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या.. यामुळं अनेक वाहनांचं नुकसान झालं. दादरमध्ये मध्यरात्रीपासून अऩेक भागात पाणी साचलं होतं. परळ आणि एलफिस्टनमध्ये अनेक सखल भागात पाणी साचल्यामुळं नागरिकांचे प्रचंड हाल झाले. ठाणे स्टेशन परिसरात आणि शहरातल्या अनेक ठिकाणी पावसानं नागरिकांची चांगलीच दैना उडवली. अनेक ठाणेकर काही तास रेल्वे स्टेशनवर ताटकळून घरी परतले.
मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्यानं तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली. लोकल बंद असल्यानं मुंबईकरांना रेल्वे ट्रॅकमधून पायपीट करण्याची वेळ आली. कल्याण स्थानकात अनेकजण अडकून पडले होते. तर अशा रितीनं पावसानं ओपनिंगलाच आपला स्टाईक रेट दाखवून दिला आणि पालिकेला पहिल्याच बॉलमध्ये क्लीन बोल्ड करून टाकलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.