www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलीय. कलम १४९ च्या अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईची ही नोटीस बजावण्यात आलीय. १२तारखेला राज ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये मुंबईत निघणा-या मोर्च्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी राज ठाकरेंची असेल असं या नोटीशीत बजावण्यात आलंय.
राज ठाकरे यांनी सरकारला आव्हान दिल्यानंतर, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी कारवाईचे संकेत दिलेत. हिंमत असेल तर सरकारने मला अडवून दाखवावं, अटक करून दाखवावं, असं आव्हान राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत बोलताना दिलं. त्यावर कुणी कायदा हातात घेतला तर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिलाय. तसंच टोलनाक्यांची तोडफोड केल्यास दोषींना अटक करून, नुकसान भरून काढणार असल्याचंही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
टोलच्या विरोधात राज ठाकरे यांनी यल्गार पुकारून राज्य सरकारलाच आव्हान दिलंय. १२ फेब्रुवारीला राज्यभरात रास्ता रोको आंदोलन रंगणार आहे. मात्र त्याआधीच मनसे कार्यकर्त्यांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांनी सुरूवात केलीय. एवढंच नव्हे तर प्रक्षोभक भाषणं करणा-या राज ठाकरेंच्या मनसेची राजकीय मान्यता रद्द करावी, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल झालीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.