www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
या नव्या वर्षात प्लॅस्टिकच्या नोटा वापरायला मिळण्याची शक्यता आहे.... अर्थात त्याची सगळी प्रक्रिया होईपर्यंत वर्षअखेर उजाडेल... पण त्याची प्रक्रिया सुरू झालीय.... कशा असतील या प्लॅस्टिकच्या नोटा.... पाहुयात एक रिपोर्ट....
रिझर्व बँक आता गांधीजींचा हा फोटो आणखी चमकवणार आहे. चुरगळलेल्या आणि जीर्ण झालेल्या नोटांऐवजी को-या करकरीत प्लॅस्टिकच्या नोटांवर आता गांधीजी दिसणार आहेत.
खोट्या आणि जीर्ण झालेल्या नोटांची अडचण दूर करण्यासाठी प्लास्टिकच्या नोटा आणण्याचा आरबीआयचा विचार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर 10 रुपयांच्या नोटा येणार आहेत. त्यासाठीच्या टेंडरची प्रक्रिया पूर्ण झालीय. एखाद दोन महिन्यांमध्ये एखाद्या कंपनीला त्यासंदर्भातलं कॉन्ट्रॅक्ट दिलं जाईल. सुरुवातीला प्लॅस्टिकचं शंभर कोटींचं चलन बाजारात आणलं जाणार आहे. सिमला, भुवनेश्वर, मैसूर, कोची आणि जयपूरमध्ये अशा प्रकारच्या नोटा वापरल्या जातील. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये या नोटा कितपत टिकतात, त्याचा अंदाज घेतला जाणार आहे.
प्लास्टिकचं चलन अनेक देशांमध्ये वापरलं जातं....
सगळ्यात पहिल्यांदा रिझर्व बैंक ऑफ आस्ट्रेलियानं डॉलर छापण्यासाठी प्लॅस्टिकचा उपयोग केला. त्यानंतर न्यूझीलँड आणि सिंगापुरसारख्या देशांमध्येही प्लॅस्टिकचं चलन वापरात आलं. प्लॅस्टिकच्या नोटा असल्यानं फाटण्याचा आणि भिजून खराब होण्याचा धोका नसतो.... कागदाच्या तुलनेत या नोटा चौपट टिकाऊ असतात. तसंच बनावट नोटा तयार करणंही शक्य नसतं. नोटा जुन्या झाल्या की त्या तोडून त्यांचं रिसायकलिंग केलं जातं. पण प्लॅस्टिकच्या नोटा छापणं हे तुलनेनं खर्चिक असतं.
गेल्या वर्षी तब्बल १४ अरब नोटा खराब झाल्यांमुळे रिझर्व बँकेनं त्या नोटा चलनातून बाद केल्या. आता प्लॅस्टिकच्या नोटांची ट्रायल कशी होते, त्यावर बरंच काही अवलंबून राहणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.