मुंबई : शासकीय अधिकारी आणि कर्मचारी ज्या पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत ते पद नमूद करुन तसेच त्याआधी ‘सेवानिवृत्त’ असा उल्लेख करुन संबंधित प्रशासकीय कार्यालय आणि विभागाने त्यांना कायमस्वरुपी ओळखपत्र देण्याची कार्यवाही करावी, असे सामान्य प्रशासन विभागाने 23 फेब्रुवारी, 2017 च्या शासन परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
यापूर्वी सेवानिवृत्तांना एक वर्ष मुदतीसाठी ओळखपत्र देण्यात येत होते तथापि ते कायमस्वरुपी मिळावे, अशी मागणी होती. राज्य शासनाकडून ती मान्य करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी यासाठी पाठपुरावा केला.
या ओळखपत्रामूळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर निवृती वेतनाबाबतची कार्यवाही वेळेत पूर्ण होणे तसेच शासकीय रुग्णालयातील औषधोपचार, ज्येष्ठ नागरिक म्हणून रेल्वे, बँका इत्यादी ठिकाणी उपयोग करण्यासाठी होईल. सदर शासन परिपत्रक शासनाच्या या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.