मुंबई : आरपीआयच्या उमेदवारांना भाजपने परस्पर कमळ चिन्ह दिल्याने रिपाईमध्ये फूट पडली आहे. रिपाइने कमळ चिन्ह घेणाऱ्या उमेदवारांना पक्षातूनच निलंबित केले आहे. दरम्यान, रिपाईचे अनेक कार्यकर्ते भाजपच्या गळाला लागले आहेत.
कमळ चिन्ह घेऊन निवडणूक लढवणाऱ्या पुणे, सोलापूरच्या रिपाई (आठवले) गटाच्या उमेदवारांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. लोणावळा येथे झालेल्या आरपीआयच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. पक्षाचे राज्य सरचिटणीस राजा सरवदे यांनी ही घोषणा केली.
तसेच पुणे शहर कार्यकारिणीही बरखास्त केली आहे. आधीच गटबाजीचे ग्रहण लागले आहे. आरपीआय आणि भाजप यांच्यात सध्या युती झाली आहे. जेव्हा ही युती झाली तेव्हा भाजपनं कमळ या चिन्हावर रिपाईने उमेदवार लढवावे, असा प्रस्ताव ठेवला होता. मात्र रामदास आठवलेंनी हा प्रस्ताव फेटाळला होता. तसेच जागा वाटपात जागा कमी दिल्याने ही युती मुंबई महापालिकेसाठी असल्याचेही स्पष्ट केले होते. त्यामुळे इतर ९ महापालिकेत रिपाई स्वबळावर निवडणूक लढवत आहे, असे स्पष्ट केले.