www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कुर्ल्यातील ‘एमटीएनएल’ या रस्त्याचे काम पूर्ण होऊन वाहतुकीसाठी सुरू झाल्यामुळे साकीनाका ते सहार एअरपोर्टपर्यंतचे अंतर अवघ्या तीन मिनिटांत पार पाडणे वाहन चालकांसाठी शक्य झाले आहे. अथक सेवा संघाचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी हे स्पष्ट केलंय.
महानगरपालिकेने कुर्ला-एल विभागातील लाठिया रबर रोड व एमटीएनएल रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू केले. सन २००५ मध्ये या दोन्ही रस्त्यांचे काम एमएमआरडीएकडे देण्यात आले होते. परंतु एमएमआरडीएला ते शक्य न झाल्यामुळे रखडलेले काम पालिकेने हाती घेतले. मात्र, प्रकल्पग्रस्तांच्या समस्येमुळे ३१ मार्च २०१३ मध्ये प्रकल्पाची मुदत संपली होती. पालिका आयुक्तांनी व्यवहार केल्यानंतर अंधेरी-कुर्ला रोड ते मिठी नदीपर्यंत विकसित झाले आहे आणि मिठी नदीवर दोन पूल बांधले गेले आहेत.
‘एमटीएनएल’ रस्त्याची लांबी ४८ मीटर व रुंदी १६.३० मीटर असून एकूण खर्च ७.६८ कोटी रुपये आहे. लाठिया रबर रस्त्याचा एकूण खर्च १४ कोटी असून लांबी ५८२ मीटर आणि रुंदी १८.३० मीटर आहे. मिठी नदीवर ५.५ कोटींच्या दोन पुलांचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे साकीनाका व सहार विभागाला जोडण्याचे काम पालिकेने केले. लाठिया रबर रोडचे काम ९४ टक्के पूर्ण झाले असून एप्रिल २०१४ पर्यंत रस्ताही वाहतुकीसाठी खुला होणार आहे. साकीनाका, मरोळ असा वळसा घालून सहार एअरपोर्टपर्यंत जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत होणार असून सहार एलिव्हेटेड रस्त्यामुळे साकीनाका ते पश्चिोम द्रुतगती मार्गाचे अंतर अवघ्या आठ मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.