www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी दत्ताजी ताम्हणे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. मुलुंडच्या साईधन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रात्री अकरा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
दत्ताजींचा जन्म १३ एप्रिल १९१३ ला रत्नागिरीमध्ये झाला. नुकतीच त्यांनी वयाची एकशे एक वर्षे पूर्ण केली होती. येत्या १३ एप्रिलला त्यांना १०२ वर्ष पूर्ण होणार होते. मात्र त्याआधीच त्यांचं निधन झालं. दत्ताजी ताम्हणे यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. गांधीजींचे अनुयायी म्हणून दत्ताजी ताम्हणे यांची ओळख होती. ठाणे शहर, तालुका आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे ते अध्यक्ष होते.
महात्मा गांधींच्या ‘यंग इंडिया’ मासिकाचे संपादक स्वामी आनंदजी ठाण्यास वास्तव्यास असताना दत्ताजी त्यांच्या संपर्कात आले. याच काळात त्यांनी सरकारी नोकरी न करण्याचा आणि आजन्म अविवाहित राहण्याचा निश्चय केला. १९४५च्या ‘चले जाव’ आंदोलनादरम्यान त्यांना दोन वर्षे कारावास भोगावा लागला. ठाणे जिल्ह्यातल्या जंगल कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी लढा छेडला.
जव्हार संस्थानातल्या आदिवासींना मार्गदर्शन दिलं. त्यांनी लिहिलेल्या ‘कळीचा घोडा’ या कुळकायद्यावरच्या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ यातदेखील त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९६८ साली ते महाराष्ट्र विधान परिषदेत निवडून आले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.