मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात बोलण्यापेक्षा कृतीची जास्त गरज आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. या सरकारने मराठा समाजाचे प्रश्न समजून घेतले नाहीत म्हणून ही परिस्थिती आली आहे, असे मराठा मोर्चावरुन सरकारचे कान टोचले.
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात कृती करा. राज्यकर्त्यांनी केवळ ‘समाजाच्या भावनांशी सहमत आहोत’ असे म्हणून चालणार नाही. राज्यकर्त्यांनी कृती करायला हवी, असे सांगत पवार यांनी सत्ताधारी भाजपला टोला लगावला.
गेल्या काही दिवसांत राज्यभरात विविध मागण्यांसाठी मराठा समाजाकडून काढण्यात येत असलेल्या मोर्च्यांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली भूमिका मांडली. मी राज्यकर्ता नाही. माझ्या हातात काही अधिकार नाहीत. त्यामुळे ज्यांच्या हाती अधिकार आहेत, त्यांनी कृती करायलाच हवी, असे पवार यांनी सांगितले.
शेती आणि आरक्षणाबाबतची सरकारी अनास्था मराठा समाजाच्या उद्रेकास कारणीभूत आहे. अशावेळी राज्य सरकारने चर्चेत वेळ काढण्यापेक्षा ठोस निर्णय घेतले पाहिजेत. ज्यांच्या हाती सूत्रे आहेत, त्यांच्याकडून काही निर्णयच घेतले जात नाहीत, अशावेळी जनता रस्त्यावर उतरते, असे सांगत पवार यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.