मुंबई : शिवसेना-भाजपमधे पुन्हा एकदा पोस्टर वॉर रंगलंय. निमित्त आहे शिवसेना नेते संजय राऊत यांनी औरंगाबादमधे भाजपवर केलेल्या टीकेचं.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राऊत यांनी भाजप सरकारची तुलना निजामांशी केली होती. त्याला भाजप समर्थकांनी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जोरदार उत्तर दिलंय. शिवसेनेवर टीका करणाऱ्या या पोस्टर्सची अधिकृत जबाबदारी भाजपनं घेतलेली नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते असलेल्यांनी ते तयार केलं असल्याचं पोस्टरवर नमूद करण्यात आलंय.
या पोस्टर्स कॅम्पेनमागं भाजपमधल्या कुठल्या नेत्याचा हात आहे, ते अजून गुलदस्त्यात आहे. आता भाजपच्या पोस्टर्सना उत्तर देणारी पोस्टर्सही शिवसेना समर्थकांनी तयार केलीत. तीही सोशल नेटवर्किगवर झळकू लागलीत. निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षच एकमेकांची उणीदुणी काढत असल्यानं मतदार जनता मात्र दोघांचीही मजा बघतेय.
दरम्यान, भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी खुल्या मैदानात शिवसेनाला उत्तर दिले जाईल, असे म्हटले होते. मात्र, त्याआधीच पोस्टर वॉर दिसून आलेय. याचीच चर्चा आहे.