मुंबई : माजी महापौर आणि शिवसेनेचे माजी आमदार तसेच विलेपार्लेमधील प्रतिष्ठित व्यक्तीमत्त्व रमेश प्रभू यांचे राहत्या घरी निधन झाले. प्रदीर्घ आजाराने प्रभू निवास या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही दिवसांपासून ते राजकारणापासून दूर होते. राजकारणात असले तरी रमेश प्रभू यांचं समाजकार्यही मोठं होतं. त्यामुळे विलेपार्लेमध्ये त्यांची वेगळी ओळख होती. 1989ची गाजलेली निवडणूक ते जिंकले होते. पहिल्यांदाच हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणूक जिंकली होती. त्या निवडणुकीचा प्रचार वादग्रस्त ठरला होता. त्याच वादग्रस्त प्रचारामुळे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, रमेश प्रभू आणि सुभाष देसाई यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता.
2004 ला त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मनसेच्या स्थापनेनंतर ते मनसेत गेले. मनसेचे ते काही काळ उपाध्यक्ष होते तसंच त्यांनी खासदारकीचीही निवडणूक लढवली होती.