मुंबई: मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला सहा वर्षे पूर्ण होतायत. या हल्ल्यानंतर मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र सहा वर्षे उलटली तरी सीसीटीव्ही लावायला अद्याप सरकारला मुहूर्त सापडलेला नाही.
इतिहासापासून आपण काहीच शिकत नाही, हेच खरं... मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला बुधवारी ६ वर्षे पूर्ण होतायत. पण शिवाजी महारांजाच्या नावानं राजकारण करणारे सत्ताधारी नेते सहा वर्षात साधे सीसीटीव्ही लावू शकलेले नाहीत. मंत्रालयातल्या एसी केबिनमधून राज्यकारभार हाकणाऱ्या प्रशासकीय बाबूंनी सुरक्षेसारखा महत्त्वाचा विषय लालफितीच्या कारभारात गुंडाळून ठेवलाय. २६/११ हल्ल्यानंतर मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात सीसीटीव्ही लावण्याची योजना आखण्यात आली. मात्र निविदा, फेरनिविदा, चर्चा, समिती अशा सरकारी चक्रव्यूहात ही योजना अडकून पडलीय. आधीच्या पृथ्वीबाबा सरकारनं सीसीटीव्ही लावू असं फक्त सांगितलं; तत्कालिन गृहमंत्री आर आर पाटील यांनी लंडन दौरा केला; पण सीसीटीव्ही काही लागले नाहीत.
सीसीटीव्हीवरून यापूर्वी आक्रमक भूमिका घेणारे तत्कालिन विरोधक आता सत्ताधारी बनलेत. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह खातं देखील आहे. सीसीटीव्ही निविदा पुन्हा फायनल करण्यात आली असून, लवकरच निधीही उपलब्ध करून देऊ, असं सरकार सांगतंय.
सीसीटीव्हीसारख्या गंभीर विषयावर सरकारचा कासवछाप कारभार पाहता, मुंबईची सुरक्षा रामभरोसेच आहे, हे वेगळं सांगायला नको.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.