वडाळ्यात बलात्कार झालेल्या 'त्या' चिमुरडीची अवस्था गंभीर

वडाळ्यात एक हादरवून टाकणारी घटना घडलीय. ९ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झालाय. त्याला एक महिना उलटलाय. आजही त्या चिमुरडीची अवस्था अंगावर शहारे आणणारी आहे. 

Updated: Nov 25, 2014, 07:21 PM IST
वडाळ्यात बलात्कार झालेल्या 'त्या' चिमुरडीची अवस्था गंभीर title=

मुंबई: वडाळ्यात एक हादरवून टाकणारी घटना घडलीय. ९ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झालाय. त्याला एक महिना उलटलाय. आजही त्या चिमुरडीची अवस्था अंगावर शहारे आणणारी आहे. 

काय घडली होती घटना 

एक अशीच चिमुकली कळी... ती उमलण्याआधीच तिला कुस्करण्याचा प्रयत्न झालाय. २४ ऑक्टोबरची ती रात्र... ती घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाली... आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिचं वय अवघं नऊ वर्षांचं... आपल्याबरोबर नक्की काय झालंय, हे तिला धड कळतही नव्हतं. तशाच परिस्थितीत ती चालत घरी आली. तिला सायन हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करुन आता एक महिना झालाय. पण आजही कुठलाही अनोळखी माणूस दिसला की ती घाबरते. अर्थात तिच्यासोबत जे घडलंय ते अक्षरशः हादरवून टाकणारं आहे.

बलात्कार करताना तिच्या ओठात दगड आणि वाळू भरण्यात आली होती. त्यामुळं तिचे ओठ सुजले होते, ते आजही तसेच आहेत. तिच्या गुप्तांगांना जखमा झाल्यामुळं तिला नैसर्गिक विधी करता येत नाहीत. त्यासाठी तिच्यावर कोलोस्टॉमी करण्यात आलीय. त्यासाठी बॅगेची रिंग बसवण्यासाठी तिच्या ओटीपोटाला छेद देण्यात आलाय, त्यात एक रिंग बसवण्यात आलीय. उपचारादरम्यान तिच्या पाठीवर आणि पोटावर पुळ्या उठल्यायत.  

मुळातच बलात्कार झालेल्या या चिमुरडीचा संघर्ष पुन्हा सुरू झाला तो आपल्या निर्ढावलेल्या आणि असंवेदनशील व्यवस्थेशी. खरं तर तिच्या या वेदनेनं एखाद्या दगडालाही पाझर फुटला असता. पण हॉस्टिपलच्या व्यवस्थेनं दगडालाही लाजवलं.

25 ऑक्टोबरच्या पहाटे जेव्हा तिला सायन हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं, तेव्हा हॉस्पिटलनं तिला चक्क एका जनरल वॉर्डमध्ये ठेवलं. तिच्यावरच्या उपचारांकडेही नीट लक्ष देण्यात आलं नाही. उपचार पूर्ण न होताच खुशाल डिस्चार्ज देऊन टाकला. तिचं रोजचं स्पंजिंग करण्यासाठी गरम पाणी पुरवण्याची तसदीही हॉस्पिटलनं घेतली नाही.  

मीडियानं याप्रकरणी आवाज उठवल्यावर राजकीय नेत्यांचे सायन हॉस्पिटलमध्ये दौरे झाले. महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी एनजीओमार्फत तिला दत्तक घेण्याचं आश्वासन दिलंय. पण अजूनही राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेचा लाभ या मुलीला मिळालेला नाही. 

या घटनेच्या तपासाबद्दल बोलायचं झालं तर 

24 तारखेला रात्री साडे बारानंतर वडाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. 12 नोव्हेंबरला पोलिसांनी त्या मुलीला घटनास्थळी नेलं. पण १३ नोव्हेंबरपर्यंत सगळे पुरावे नष्ट करण्यात आले होते. अर्थात वीस दिवसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर काय पुरावे मिळणार होते, ते पोलिसांनाच माहीत. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आणि सोडून दिलं, तर काही जणांची डीएनए टेस्ट करण्यात आलीय.  

हॉस्पिटलमध्ये काय घडलं?

9 वर्षाची ही पीडित मुलगी गेल्या एक महिन्यापासून सायन हॉस्पिटलमध्येच उपचार घेतेय. हे तेच हॉस्पिटल आहे ज्याठिकाणी सुरुवातीला याच 9 वर्षाच्या चिमुरडीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. तिला बलात्कार पिडिताला जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. तिच्या उपचारासाठी तिच्या वडिलांकडून केस पेपर आणि औषधांसाठी पैशांची मागणी करण्यात आली. तिच्या पूर्ण उपचाराआधीच तिला डिस्जार्ज देण्यात आला. इतकच काय तर काही दिवसांपर्यंत तिला स्पेशल वॉर्डही देण्यात आला नव्हता..याच हॉस्पटलमध्ये कालपासून म्हणजेच 24 नोव्हेंबरपासून ते 29 नोव्हेंबरपर्यंत सायन हॉस्पिटलच्या 50 वर्षापूर्ण झाल्याबद्दल सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात येतोय. आज याच हॉस्पिटलमध्ये सांस्कृतीक कार्यक्रम करण्यात आला. याच ठिकाणी सुवर्ण महोत्सवी रांगोळीचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. असेच कार्यक्रम 29 तारखेपर्यंत साजरे करण्यात येणार आहेत. ज्या तत्परतेने सायन हॉस्पटलचे प्रशासन आपल्या 50 वर्षाच्या वैद्यकीय सेवेचा सण साजरा करतंय. त्यामुळे त्याच तत्परतेने आलेल्या बलात्कार पिडितेसारख्या अत्यंत संवेदनशील प्रकरणांना हाताळावं इतकीच सामान्य जनतेची अपेक्षा आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.