एस.टी. कर्मचाऱ्यांना खूश खबर, पगार वाढला

एसटी कर्मचाऱ्यांना १३ टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय शुक्रवारी रात्री मुंबईत झालेल्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे एसटीचा २३ एप्रिलपासून सुरू होणारा संप टळला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 14, 2013, 08:28 AM IST

www.24taas.com, मुंबई

एसटी कर्मचाऱ्यांना १३ टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय शुक्रवारी रात्री मुंबईत झालेल्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे एसटीचा २३ एप्रिलपासून सुरू होणारा संप टळला आहे.
कामगारांच्या मूळ वेतनात सरसकट १३ टक्क्यांची वाढ होणार असून नियमित चालकांना केवळ २५०० तर वाहकांना २७५० रुपयांपर्यंत वाढ मिळणार आहे. तसेच धुलाई आणि शिलाई भत्ता मिळणार आहे. त्यामुळे वर्षाला एसटीवर तब्बल पाचशे कोटी रुपयांचा भार पडणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी देऊ केलेल्या दहा टक्के वेतनवाढीवरून सुरू असलेल्या संघर्षाला केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी यशस्वी शिष्टाई करत पूर्णविराम दिला. वर्षभरापासून अडकून पडलेला एसटी कामगारांचा वेतन करार अखेर झाला. वेतन करार एप्रिल २०१२ पासून लागू होणार आहे.

या बैठकीला मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या प्रतिनिधींसह एसटीचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीतील या निर्णयास एसटीच्या बोर्डाने मंजुरी दिल्यानंतरच त्याची अंमलबजावणी होणार आहे.