www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई पोलिसांची इमेज धुळीला मिळवणारी घटना मुंबईत घडलीय. भोईवाडा पोलिसांनी एका वादकाला नाहक बदडून काढल्याची घटना समोर आली... इतकंच नव्हे तर त्याला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून गुन्हा कबुल करण्यासाठी त्याच्यावर जबरदस्तीही केली गेली.
तालवादक सूर्यकांत सुर्वे यांना चोरीच्या खोट्या आरोपांवरून मुंबईत भोईवाडा पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल सचिन घाडगे यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आलीय. सूर्यकांत सूर्वे यांनी उस्ताद झाकीर हुसेन, शंकर महादेवन, सुरेश वाडकर, श्रीधर फडके अशा अनेक प्रसिद्ध गायक-संगीतकारांना मैफलींमध्ये तालवाद्यांची साथ-संगत दिलीय.
डॉक्टरचे पाकिट चोरल्याच्या आरोपावरून पोलिसांनी खातरजमा न करता सुर्वे यांना पोलीस चौकीत नेऊन पट्ट्याने बेदम मारहाण केली. गुन्हा कबुल करावा, अशी ताकीद देत सुर्वे यांच्यावर पोलीस कॉन्स्टेबल सचिन घाडगे यांनी रिव्हॉल्व्हरही रोखलं. दरम्यान, या सर्व प्रकाराबद्दल सुर्वे यांनी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, यामध्येही पोलिसांनी टाळाटाळ केली... आणि तक्रार दाखल केल्यानंतर मारहाण करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल सचिन घाडगेची त्वरित जामिनावर सुटकाही करण्यात आली.
या संपूर्ण घटनेबाबत स्वतः सूर्यकांत सुर्वे यांनी `झी २४ तास`कडे आपली व्यथा मांडलीय. सूर्वेंची साधी तक्रारही नोंदवून घेण्यातही टाळाटाळ करणाऱ्या भोईवाडा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर गृहमंत्री आर आर पाटील आता काय कारवाई करणार? असा प्रश्न आता विचारला जातोय.
व्हिडिओ पाहा-
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.