आदिवासींच्या मंगळसूत्रांवर अधिकाऱ्यांचा डल्ला...

 आदिवासींसाठी असलेल्या योजना अधिकारी आणि कंत्राटदार कसे लाटतात त्यांचे आणखी एक उदाहरण माजी न्यायमूर्ती  एम. जी. गायकवाड यांच्या समितीने समोर आणले आहे. कन्यादान योजने अंतर्गत आदिवासी महिलांना देण्यात येणाऱ्या मंगळसूत्रसह इतर साहित्य योजनेत अधिकारी आणि कंत्राटदारांनी संगनमत करून मोठा घोटाळा केला आहे. अधिकाऱ्यांनी तर आदिवासींची खोटी लग्ने दाखवून मंगळसूत्र आणि इतर साहित्य बेकायदेशीररित्या विकल्याचेही समोर आले आहे.

Updated: May 9, 2017, 08:31 PM IST
 आदिवासींच्या मंगळसूत्रांवर अधिकाऱ्यांचा डल्ला...

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई :  आदिवासींसाठी असलेल्या योजना अधिकारी आणि कंत्राटदार कसे लाटतात त्यांचे आणखी एक उदाहरण माजी न्यायमूर्ती  एम. जी. गायकवाड यांच्या समितीने समोर आणले आहे. कन्यादान योजने अंतर्गत आदिवासी महिलांना देण्यात येणाऱ्या मंगळसूत्रसह इतर साहित्य योजनेत अधिकारी आणि कंत्राटदारांनी संगनमत करून मोठा घोटाळा केला आहे. अधिकाऱ्यांनी तर आदिवासींची खोटी लग्ने दाखवून मंगळसूत्र आणि इतर साहित्य बेकायदेशीररित्या विकल्याचेही समोर आले आहे.

आदिवासींसाठी अनेक चांगल्या योजना आखल्या जातात, मात्र त्या कागदावरच कशा राहतात याची सुरस माहिती माजी न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड यांच्या चौकशी समितीने समोर आणली आहे. विजय कुमार गावित आदिवासी विकास मंत्री असताना 2004 ते 2009 या काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी ही गायकवाड समिती स्थापन करण्यात आली होती. 

सामुदायिक विवाह सोहळ्या अंतर्गत आदिवासींची लग्न लावण्यासाठी राज्य सरकारने राबवलेल्या कन्यादान योजनेत घोटाळा झाल्याचे गायकवाड समितीने समोर आणले आहे.

- कन्यादान योजनेत आदिवासी जोडप्यांना देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे साहित्य खरेदी करण्यात आले
- यात सोन्याचे मंगळसूत्र, भांडी आणि नवे कपड्यांचा समावेश होता
- मात्र सोन्याच्या मंगळसूत्रासह यातील अनेक साहित्य आदिवासी जोडप्यांना न देता बेकायदेशीररित्या विकण्यात आले
- चौकशी समितीने नाशिकमधील तिरडे या आदिवासी खेड्यात सामुदायिक लग्नाचा एक घोटाळा उदहराणार्थ अहवालात दिला आहे
- तिरडा गावात कन्यादान योजनेंतर्गत 20ा08िवशी  ८०० जोडप्यांचा सामुदायिक विवाह झाल्याचे दाखवण्यात आले
- प्रत्येक जोडप्याला सोन्याचे मंगळसूत्र, भांडी, कपडे असे १० हजार रुपयांचे साहित्य दिल्याचे दाखवण्यात आले
- मात्र तिरडा खेड्यात केवळ २०० आदिवासी कुटुंब राहत असल्याचे उघडकीस आले आहे
- गायकवाड समितीच्या चौकशीत कन्यादान योजनेचे लाभार्थी दाखवणे अधिकाऱ्यांना शक्य झाले नाही
- काही प्रकरणात अधिकाऱ्यांनी समितीसमोर पुरावे सादर केले, मात्र हे पुरावेही संशयास्पद 
- कन्यादान योजनेत साहित्य पुरवण्यासाठी काही ठराविक कंत्राटदारांनाच कंत्राट दिले गेले
- डहाणू तालुक्यात आदिवासी जोडप्यांना कपडे पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले होते, कंत्राटदाराने कपड्याच्या दुकानाच्या दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्षात कपड्याचे दुकान नसून इलेक्ट्रीकचे दुकान आढळले

आदिवासी विभागात 2004 ते 2009 साली झालेल्या घोटाळ्यांची यादीच गायकवाड समितीच्या अहवालात आहे. आदिवासी जोडप्यांसाठी असलेले सोन्याचे मंगळसूत्र आणि इतर साहित्यही राजकारण्यांच्या मदतीने कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी लाटले. इतकेच नव्हे तर दुधाळ जनावरे पुरवण्याच्या कामातही मोठा भ्रष्टाचार या काळात झाला आहे.

 

 

कन्यादान योजनेतील घोटाळ्याबरोबरच आदिवासींना उपजिविकेसाठी दुधाळ जनावरे पुरवण्याच्या योजनेतही अशाप्रकारचा घोटाळा झाल्याचे गायकवाड समितीने समोर आणले आहे.

- माजलगाव येथील स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला दुधाळ जनावरे देण्याचे कंत्राट देण्यात आले होते
- ही संस्था हे कंत्राट मिळण्याच्या काही महिने आधीच स्थापन झाली होती तसेच संस्थाला या कामाचा पूर्वानुभव नव्हता
- जनावराची किंमत त्याचे वय, आरोग्य याच्यावर अवलंबून असते
- मात्र कंत्राटदाराने सर्व जनावरांची एकच किंमत लावल्याचे आढळले
- अनेक आदिवासी भागात दुधाळ जनावरे पुरवल्याच्या बोगस पावत्या चौकशी समितीला आढळल्या
- ही जनावरे आदिवासींना पुरवण्यासाठी बाहेरून खरेदी केल्याचे पुरावे कंत्राटदार सादर करू शकला नाही

आदिवासी प्रकल्प अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने राज्यभरातील आदिवासी जिल्ह्यात अनेक योजनेत घोटाळे झाल्याचे माजी न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड समितीने समोर आणले आहे. राज्यातील २४ पैकी तब्बल २३ आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांविरोधात आदिवासी घोटाळाप्रकरणी कारवाई करण्याची शिफारस समितीने आपल्या अहवालात केली आहे.