मुंबई : पोलिसांवर हात उगरण्याचा प्रकार काही केला थांबताना दिसत नाही. आता तर चक्क दोन महिलांनी पोलीस ठाण्यात घुसून महिला पोलीस कर्मचाऱ्यांना जोरदार मारहाण केली. चार कर्मचाऱ्यांना दोघींनी जेरीस आणले.
ठाणे येथे महिला वाहतूक पोलिसाला एका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भर रस्त्यात मारहाण केल्याचे पुढे आले. आता विरारमध्ये चार महिला पोलिसांना पोलिस ठाण्यात घुसून मारहाण केल्याची घटना समोर आलेय. विरारमधील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात प्रज्ञा सिंग आणि गार्गी सिंग या दोन बहिणींनी महिला पोलिसांना मारहाण केली.
चार दिवसांपूर्वी प्रज्ञा आणि गार्गी या दोन बहिणींनी अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात एका तरूणाविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला की नाही याची माहिती घेण्यासाठी सोमवारी सायंकाळी त्या पोलीस ठाण्यात आल्या होत्या. मात्र, पोलिसांनी ही तक्रार मराठीत लिहून घेतली होती.
आम्हाला मराठी कळत नाही तुम्ही हिंदीतून अथवा इंग्रजीतून तक्रार लिहा तरच आम्हाला यात काय लिहले आहे ते कळेल, अशी विनंती केली. मात्र, महिला पोलिसांनी आम्ही काम कसे करायचे ते तुम्ही शिकवू नका, असे सांगितले. त्यातून वाद सुरु झाला. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा करत. तसेच महिला पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली.
वाद होत असल्याचे लक्षात आले असताना महिला पोलिस कर्मचारी रूपाली भोईर या दोघींना समजावू लागल्या. मात्र, दोन्ही बहिणींनी भोईर यांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्या हाताला चावा घेतला. अन्य महिला पोलीस मदतीला आल्यात. त्यांनाही या दोघींनी त्यांनाही मारहाण केली.
दरम्यान, प्रज्ञा सिंग, गार्गी सिंग या दोघींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.