मुंबई : उद्धव आणि राज ठाकरे या दोघा भावांची काल पुन्हा भेट झाली. उर्वशी ठाकरे हिची चौकशी करण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे हिंदुजामध्ये पोहोचले. राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी स्कूटी अपघातात जखमी झाल्यानं तिच्यावर हिंदुजामध्ये उपचार सुरू आहेत. तिची उद्धव यांनी पुन्हा भेट घेतली.
रविवारी उद्धव यांनी कोल्हापूर दौरा संपताच मुंबई गाठल्यावर तातडीनं हिंदुजात धाव घेतली. त्यावेळीही उद्धव आणि राज या दोघांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली. तर काल सोमवारीही दोघा ठाकरे बंधुंमध्ये अर्धा तास चर्चा झाली. यानिमित्तानं दोघा ठाकरे बंधुंमधला कौटुंबिक कलह कमी होऊन जवळीक वाढतानाची चिन्हं दिसत आहेत.
निवडणुकीच्या काळात या दोन कुटुंबातले संबंध तितकेचे चांगले नव्हते. पण आता सलग दोन दिवस उद्धव आणि राज यांची भेट झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नव्यानं चर्चा सुरू झालीय. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली होती. त्यावेळी राज ठाकरे त्यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते. उद्धव य़ांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज ठाकरेंनी उद्धव यांना मातोश्रीवर पोहोचवलं होतं. ५ जुलै २०१२ ची ही घटना. तर आता राज यांची मुलगी उर्वशी हिंदुजात अॅडमिट असताना उद्धव आणि रश्मी ठाकरे यांनी सलग दोन दिवस उर्वशीची विचारपूस केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.