मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : तुम्ही कधी पाण्यामध्ये बुद्धीबळ खेळला आहात किंवा पाण्यामध्ये कधी सायकल चालवली आहे. नसेल तर तुम्हालाही तुमच्या आवडीचा पाण्यातील खेळ खेळण्याची संधी उपलब्ध झालीय. ऊन्हाची लाही थोडी कमी करण्यासाठी अशाप्रकारे अंडर वॉटर स्पोर्ट्सचं आयोजन मुंबईत करण्यात आलं होतं.
मुंबईत उन्हाळ्याच्या झळांनी नागरिक हैराण झालेत. घामाच्या धारांनी मैदानातली खेळाडूंची संख्याही रोडावलीय. मात्र, यावर आता उपाय शोधण्यात आलाय.
मुंबईत 'अंडर वॉटर फेस्टीव्हल'चं आयोजन करण्यात आलंय. पाण्यामध्ये विविध खेळ खेळण्याची आयडिया सुचली इंजिनिअरींगच्या दोन विद्यार्थ्यांना... ऑक्सिजन मास्क लावून अनेक खेळाडूंनी या 'अंडर वॉटर फेस्टीव्हल'मध्ये पाण्याखाली खेळ खेळले. कोणी पाण्याखाली सायकल चालवली... काही जण बुद्धीबळ खेळत होते... तर व्हॉलीबॉल आणि हॉकीच्या मॅचेसही रंगल्या. विशेष म्हणजे दिव्यांगांनीही यात सहभाग नोंदवला.
अशा फेस्टीव्हलचं आयोजन याआधी पुण्यात करण्यात आलं होतं. नोटबंदीच्या काळात हा फेस्ट झाला होता. तरीही या फेस्टीव्हलला मस्त प्रतिसाद लाभला होता. आता मुंबईतही हा फेस्टीव्हल झाला. मॉडेल वर्षा दोषी हीदेखील यात सहभागी झाली होती. कडक उन्हाळ्यात 'अंडरवॉटर गेम फेस्टीव्हल'नं मुंबईकरांना चांगलाच थंडावा दिलाय.