मराठी हद्दपार : UPSCप्रकरणी राज ठाकरे गप्प का?

केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC नं प्रादेशीक भाषांमध्ये परीक्षा देण्याचा पर्याय काढून टाकलाय. आयोगाच्या या निर्णया विरोधात शिवसेनेनं हुतात्माचौकात आंदोलन केलंय. मात्र, मराठीच्या मुद्यासाठी रान उठवणा-या राज ठाकरेंच्या मनसेकडून या विषयावर अद्याप पर्यंत कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 6, 2013, 04:47 PM IST

www.24taas.com,मुंबई
केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC नं प्रादेशीक भाषांमध्ये परीक्षा देण्याचा पर्याय काढून टाकलाय. आयोगाच्या या निर्णया विरोधात शिवसेनेनं हुतात्मा चौकात आंदोलन केलंय. मात्र, मराठीच्या मुद्यासाठी रान उठवणा-या राज ठाकरेंच्या मनसेकडून या विषयावर अद्याप पर्यंत कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही.
UPSC नं प्रादेशीक भाषांमध्ये परीक्षा देण्याचा पर्याय काढून टाकल्याने स्थानिक लोकाधिकार समितीचे अध्यक्ष गजानन किर्तीकर यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. या आंदोलनाला परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC नं आपल्या अभ्यासक्रमातून मराठीसह सर्व प्रादेशिक भाषांची हकालपट्टी केलीय.
आयोगाच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमात यंदाच्या वर्षी बदल करण्यात आलाय. हा सुधारीत अभ्यासक्रम आयोगाच्या वेबसाईटवर मंगळवारी अपलोड करण्यात आला असून यामध्ये प्रादेशिक भाषांचा पर्याय काढून टाकण्यात आलाय.

एकीकडं मराठी भाषेत सर्व पेपर सोडवून UPSC ची परीक्षेत यशस्वी होणा-यांची संख्या वाढत असतानाच UPSC नं मराठी विषयाला सुटी दिल्यानं विद्यार्थ्यांच्या तयारीवर मोठा परिणाम होणार आहे. पूर्वीच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना दोन वैकल्पिक विषयांची निवड करणे अत्यावश्यक होते. त्यामध्ये एक कंपलसरी इंग्रजी आणि दुस-या कोणत्याही प्रादेशिक भाषेचा समावेश होता. राज्यातील बहुतेक विद्यार्थी सहाजिकच मराठीची निवड करत असत. मात्र आता त्यांना मराठी निवडता येणार नाहीय.
या अभ्यासक्रमानुसार घेण्यात येणारी पूर्वपरीक्षाही एक आठवडा पुढं ढकलण्यात आलीय. ही परीक्षा आता १८ मे ऐवजी २६ मे रोजी घेण्यात येणार असल्याचं आयोगानं जाहीर केलंय.