मुंबईत प्रेमाचं सेलिब्रेशन बिनधास्त!

व्हॅलेंटाईन साजरा करणाऱ्या प्रेमवीरांना यावर्षी शिवसैनिकांपासून धोका नाही. कारण, दरवर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’ला विरोध करणाऱ्या शिवसेनेनं यावर्षी आपली तलवार म्यान करायचं ठरवलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 14, 2013, 09:12 AM IST

www.24taas.com, मुंबई
व्हॅलेंटाईन साजरा करणाऱ्या प्रेमवीरांना यावर्षी शिवसैनिकांपासून धोका नाही. कारण, दरवर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’ला विरोध करणाऱ्या शिवसेनेनं यावर्षी आपली तलवार म्यान करायचं ठरवलंय.
‘नेमेची येतो व्हॅलेंटाईन डे… आणि त्यामागोमाग त्याला विरोध करणारी शिवसेना’ असं आत्तापर्यंत म्हटलं जायचं. यावर्षी, मात्र कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं. व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्या प्रेमीयुगुलांना आणि गिफ्ट कार्डची विक्री करणाऱ्यांना दरवर्षी शिवसैनिकांच्या दहशतीखाली वावरावं लागायचं. मात्र, सेनेपासून दुरावलेल्या युवा मतदारांनी मनसेमार्ग निवडल्यामुळे शिवसेनेला आता खडबडून जाग आलीय.

युवा मतदारांनी मनसेला भरघोस मतदान केल्यानं मनसेचा व्हॅलेंटाईन विरोध याआधीच मावळलाय. आदित्य ठाकरे यांची युवा आघाडी आणखी मजबूत करणे, हेही या मागचं एक प्रमुख कारण असल्याचं सांगण्यात येतंय. शिवसेनेचा कट्टर चेहरा बदलण्याच्या रणनीतीचाही हा भाग असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. कारण काहीही असो, प्रेमाचं हे सेलिब्रेशन यंदा निर्विघ्न पार पडणार, असंच दिसतंय.