मुंबई : आपल्या जादूई संगीताने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे ज्येष्ठ संगीतकार आणि गायक रवींद्र जैन यांचे लिलावती रुग्णालयात निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. जैन यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
रवींद्र जैन हे एका कार्यक्रमानिमित्त गेल्या शनिवारी नागपूरमध्ये गेले होते. मात्र मंगळवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मूत्रपिंडातील इन्फेक्शन पसरून महत्त्वाचे अवयव निकामी झाले होते. अखेरीस त्यांना उपचारासाठी मुंबईतील लिलावती रुग्णालयात हलवण्यात आले होते.
रवींद्र जैन यांचे शुक्रवारी संध्याकाळी उपचारादरम्यान निधन झाले. २८ फेब्रुवारी १९४४ मध्ये अलीगढमध्ये जन्मलेले रवींद्र जैन यांना लहानपणापासून संगीताची आवड होती. लहानपणी कोलकाता येथून त्यांनी संगीत क्षेत्रात पाऊल टाकले.
ऑल इंडिया रेडिओसाठी रेकॉर्डिंग करत असताना जैन यांची राधेश्याम झुनझुनवाला यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांनी जैन यांना मुंबईत आणले. मुंबईत आल्यानंतर आपल्या कामाचा ठसा उमटवला. जैन यांनी १५० हून अधिक चित्रपटांना संगीत दिले असून गीत गाता चल, चोर मचाये शोर, चितचोर, रामतेरी गंगा मैली अशा असंख्य चित्रपटांचा यात समावेश आहे.
याशिवाय रामायण, जय श्रीकृष्ण, हनुमान, साई बाबा यासारख्या गाजलेल्या टी.व्ही. मालिकांनाही त्यांनी पार्श्वसंगीत दिलेय. संगीत क्षेत्रातील योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार आदी पुरस्कारांनी गौरवरही करण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.