शिवसेनेसोबत उद्यापासून चर्चा - देवेंद्र फडणवीस

भाजप आणि शिवसेनेने एकत्र यायला हवं, अशी प्रामाणिक इच्छा आहे. शिवसेनेशी सत्तासहभागाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Updated: Nov 27, 2014, 03:49 PM IST
शिवसेनेसोबत उद्यापासून चर्चा - देवेंद्र फडणवीस title=

मुंबई : भाजप आणि शिवसेनेने एकत्र यायला हवं, अशी प्रामाणिक इच्छा आहे. शिवसेनेशी सत्तासहभागाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

शिवसेनेनं सत्तेत सहभागी व्हावं, यासाठी उद्यापासून पुन्हा भाजप आणि शिवसेनेत चर्चा सुरू होणार आहे. भाजपच्यावतीने ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांत पाटील हे शिवसेनेशी चर्चा करतील. तर शिवसेनेतर्फे अनिल देसाई हे चर्चा करणार आहेत.

भाजप आणि शिवसेनेने एकत्र यायला हवं, अशी प्रामाणिक इच्छा आहे. शिवसेनेशी सत्तासहभागाबाबत चर्चा करणार आहोत, असे फडणवीस यांनी मीडियाला सांगितले. त्यामुळे पुन्हा भाजप-शिवसेना युती होण्याबाबत भाजपकडून संकेत दिले जात आहेत. मात्र, शिवसेनेकडून अद्याप याबाबत उत्तर आलेले नाही. त्यामुळे भाजपच मीडियामध्ये चर्चा घडवत असल्याची कुजबूज सुरु आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या चर्चेत स्वत जातीनं लक्ष घालणार आहेत. धर्मेंद्र प्रधान उद्या मुंबईत आल्यानंतर ही चर्चा सुरु होणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दोन दिवसांपूर्वी चर्चा केली होती. शिवसेनेकडूनही दोन नेत्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचं समजतं.

दरम्यान, एकीकडे मुख्यमंत्री शिवसेनेशी चर्चेची भाषा करत असताना महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मात्र शिवसेनेला टोला लगावला आहे. त्यांना अजून बरंच काही शिकायचंय, असं खडसे म्हणत आहेत. त्यामुळे यावर शिवसेना काय उत्तर देते याकडे लक्ष लागले आहे. भाजपने मित्रत्वाचा हात पुढे केल्यानंतर शिवसेना सकारात्मक प्रतिसाद देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.