www.24taas.com, मुंबई
ग्रामीण भागात सिंचन क्षेत्रात घट का झालीय? या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला काय काय सुचू शकतात... पाऊस कमी पडलाय, पाण्याची योग्य साठवणूक झाली नाही, अशी साधीसुधी उत्तरं तुम्हा-आम्हाला सुचतील. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र याच प्रश्नावर एक भन्नाट उत्तर सुचलंय आणि तेच उत्तर त्यांनी विधानसभेतही मांडलंय.
अखेर राष्ट्रवादी झुकली!
सिंचनाच्या श्वेतपत्रिकेबाबत मुख्यमंत्र्यांच्या निर्धारापुढं राष्ट्रवादी काँग्रेस अखेर झुकलीय. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सिंचनाची श्वेतपत्रिका काढणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत केलीय. तर दुसरीकडं विरोधकांनी सिंचनाच्या मुद्यावर आक्रमक झाले आहेत. सिंचनावर चर्चेची मागणी करत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. विरोधकांना उत्तर देताना दादांना आपल्या डोक्याला जराही त्रास द्यावासा वाटला नाही. ‘दादां’च्या म्हणण्यानुसार ‘ग्रामीण भागातही शौचालयावर भरमसाठ पाणीवापर केला जातो. हा पाणीवापर ज्यादा असल्यानं त्याचा सिंचनावर परिणाम झालाय. म्हणजेच शौचालयांमुळे ग्रामीण भागातलं सिंचन घटलंय.’ गेल्या दहा वर्षांत पिण्याच्या आणि शैचालयाच्या पाण्याचा वापर वाढल्यानं सिंचनाची टक्केवारी कमी झाली असल्याचंही अजित पवारांनी नमूद केलंय.
विधान परिषदेत सिंचनाच्या मुद्यावरून जोरदार खडाजंगी झाली. सिंचनावर आतापर्यंत ४२ हजार ४०० कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती सुनील तटकरेंनी दिली. मात्र, यावरून विरोधकांनी सरकारवर एकच हल्लाबोल केला. सिंचनात या व्यतिरिक्त २३ हजार ८०० कोटी रुपये खर्च झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विनोद तावडेंनी केलाय.