दिवाळीनंतर फटाके, उडले राजकीय खटके!

खासदार संजय निरुपम यांच्या प्रकरणात दिवाळीनंतर हात घालू असं राज ठाकरे यांनी बजावल्यावर उत्तर भारतीय नेते आक्रमक झाले. इट का जबाब पत्थर से देंगे असं सांगत आझमींनी आव्हान देण्याची भाषा वापरली.

Updated: Oct 28, 2011, 02:47 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

खासदार संजय निरुपम यांच्या प्रकरणात दिवाळीनंतर हात घालू असं राज ठाकरे यांनी बजावल्यावर उत्तर भारतीय नेते आक्रमक झाले. इट का जबाब पत्थर से देंगे असं सांगत आझमींनी आव्हान देण्याची भाषा वापरली.

 

निरुपम-शिवसेना आणि राज यांच्या वादात आझमींनी युपी कार्ड काढले आहे. तर छट पूजेला पुरेसे संरक्षण द्या अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी केलीय. त्यामुळं छटपूजेचा वाद यंदाही होण्याची चिन्हे आहेत. वादात मुंबईकरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या अशी समजूतीची भाषा त्यांनी वापरली आहे.

 

निरुपम, शिवसेना आणि मनसे यांच्यातले हे फटाके सुरुच राहणार अशी चिन्हं आहेत. दिवाळीच्या आधीच परप्रांतीय कार्ड वापरत निरुपमांनी लवंगी लावून दिली आणि मग एकमेकांवरच्या आरोप प्रत्यारोपांचे फटाके दिवाळीभर वाजत राहिले.

 

निरुपमांबरोबरच इतर उत्तर भारतीय नेत्यांनीही या वादात उडी घेऊन हा वाद पेटता ठेवलाय. या वादाचा मुंबईकरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या असं सांगत कृपाशंकर सिंगांनी समजूतीचा सूर आळवलाय. पण त्याचवेळी अबू आझमींनी त्यांच्या लौकिकाला अनुसरुन ईट का जबाब पत्थर से देंगे अशी भूमिका घेतली आहे.