दुष्काळग्रस्त भागातील पत्रकारांची राज्यपालांना भेट

सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त भागातील पत्रकारांनी आज राज्यपालांची भेट घेऊन दुष्काळाची स्थिती, पाण्याचा अभाव, जनावरांच्या चा-याचा प्रश्न याची माहिती दिली.

Updated: Apr 21, 2012, 10:02 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त भागातील पत्रकारांनी आज राज्यपालांची भेट घेऊन दुष्काळाची स्थिती, पाण्याचा अभाव, जनावरांच्या चा-याचा प्रश्न याची माहिती दिली. राज्यसरकार आणि लोकप्रतिनिधी दुष्काळाबाबत गंभीर नसून दुष्काळ भागात कुठल्याही प्रकारची मदत पोहचत नसल्याची माहिती पत्रकारांनी राज्यपालांना दिली.

 

जेष्ठ पत्रकार जयश्री खाडिलकर यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले. या भागात टँकर माफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्यानं त्यांच्यासोबत लढणं कठिण असल्याचं मतही राज्यापालांनी व्यक्त केलं.

 

सांगली जिल्ह्यात दुष्काळी भागातलं भयाण वास्तव मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्यावेळी समोर आलं होतं. एकीकडे जनता पाण्यासाठी वणवण करत असताना अधिकारी मात्र बिअर बारमध्ये मौजमजा करत असल्याचा आरोप खुद्द वनमंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री पतंगराव कदम यांनी केला होता. दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यालयानं पथक पाठवावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली होती. तसंच सिंचन योजनांसाठी ७०० कोटींची मदत करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली होती.