उत्तर भारतीयांनी ठरवलं तर मुंबई ठप्प होईल, असे बेताल वक्तव्यांचे वारू उधळविणाऱ्या काँग्रेस नेते संजय निरूपमांना चाप लावत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई बंद होणार नसल्याचे सांगितले आहे.
संजय निरुपम यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. त्यावर पाणी टाकण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
विविध भाषकांच्या सहकार्याने मुंबईत व्यवहार होतात, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतेही उलटसुलट वक्तव्य करू नये, असा सबुरीचा सल्ला निरुपम यांना मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. मुख्यमंत्री यांच्या या वक्तव्याने संजय निरूपम एकाकी पडले आहेत.
उत्तर भारतीयांनी ठरवलं तर मुंबई ठप्प होईल, असं वक्तव्य संजय निरुपम यांनी नागपूरमधे केले होते. त्यावर मुंबई बंद करून दाखवा, निरूपम यांचे दात घशात घालू असे आव्हान शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी निरूपम यांना दिले होते.
मुंबई, महाराष्ट्राचा भार उत्तर भारतीयांच्या खांद्यावर आहे, असंही म्हटलंय होतं. आम्हाला उखडण्याचा प्रयत्न केला तर स्वतःच उखडाल, असंही निरुपम म्हणाले होते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर निरुपम यांनी उत्तर भारतीय राग आळवला आहे.
संजय निरुपम यांनी ‘टीम अण्णां’चे सहकारी अरविंद केजरीवाल यांनाही इशारा दिला. काँग्रेसला टार्गेट करणं सुरुच ठेवलंत, तर देशभरात चपलांच्या प्रसादाला सामोरं जावं लागेल, असं निरुपमांनी म्हटलंय.