प्लॅस्टिक पिशवीचा दंड @ 5000

मुंबईतून प्लॅस्टिक पिशव्यांना हद्दपार करण्यासाठी महापालिकेने नवी युक्ती शोधून काढली आहे.प्लॅस्टिक पिशवीचा वापर केला तर ५,००० रूपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला सावधानता बाळगण्याची गरज आहे.

Updated: Apr 20, 2012, 04:13 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

मुंबईतून प्लॅस्टिक पिशव्यांना हद्दपार करण्यासाठी महापालिकेने नवी युक्ती शोधून काढली आहे.प्लॅस्टिक पिशवीचा वापर केला तर ५,००० रूपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला सावधानता बाळगण्याची गरज आहे.  त्यासाठी मुंबईत खरेदीसाठी घरातून बाहेर निघताना आता सोबत कापडी पिशव्या घेऊन बाहेर पडावे योग्य होईल.

 

 

पन्नास मायक्रॉनपेक्षा पातळ प्लॅस्टिकच्या पिशव्यांवरील दंडाच्या रकमेत मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. फेरीवाले, दुकानदार किंवा भाजीवाले यांच्यांकडे पन्नास मायक्रॉनपेक्षा पातळ प्लास्टिकच्या पिशव्या सापडल्यास  पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. याच गुन्ह्यात दुकानदार दुस-यांदा आढळून आला तर  त्याला जास्तीचा दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

 

 

प्लॅस्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन मुंबईत  कॅरीबॅगवर बंदी आहे. ही बंद प्रभावीपणे राबवण्यासाठी दंडाची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत नगरसेवकांनी प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर संपूर्णपणे बंदीची मागणी केली. पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅगची निमिर्ती करणारे कारखाने कायमचे बंद करण्याची मागणी शिवसेनेचे विष्णू कोरगावकर यांनी केली.

 

 

दरम्यान,  बंदी असलेल्या पातळ पिशव्यांची निर्मिती ज्या विभागात सुरू असेल त्या विभागातील संबंधित सहाय्यक पालिका आयुक्तांना त्यासाठी जबाबदार धरण्याची सूचना स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी प्रशासनाला केली. आता या बंदीचा कशी अंमलबजावणी होते, याकडे लक्ष लागले आहे.