मराठी माणसांवर अत्याचार - राज ठाकरे

मराठी माणसांवर अत्याचार होत आहे. तरीही भाजप काहीही बोलत नाही. सीमाभागात मराठी माणसांवर अत्याचार कशासाठी? कर्नाटकात भाजपचेच सरकार असताना हे होतेच कसे, असा खडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपलाच विचारला आहे.

Updated: Jul 4, 2012, 05:37 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मराठी माणसांवर अत्याचार होत आहे. तरीही भाजप काहीही बोलत नाही. सीमाभागात मराठी माणसांवर अत्याचार कशासाठी? कर्नाटकात भाजपचेच सरकार असताना हे होतेच कसे, असा खडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपलाच विचारला आहे.

 

कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता असताना सीमाभागातील मराठी माणसांवर अत्याचार होत आहेत, याकडे राज यांनी लक्ष वेधले आहे. कोर्टाने बेळगाव पालिका बरखास्त करण्याच्या निर्णयाला अवैध ठरविले होते. सरकाचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले होते. पुन्हा सरकारने बेळगाव पालिका बरखास्त केली. याबाबत राज ठाकरे  यांनी भाष्य केले.  मराठी माणसावर अन्याय होत असताना महाराष्ट्रातील भाजपचे नेते गप्प का बसून आहेत, असाही सवाल राज ठाकरे यांनी केला आहे .  दरम्यान याप्रश्नी आपण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याशी बोलणार असल्याचेही  त्यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

 

मी माझ्या राज्यात काही बोललो तर कळीचा मुद्दा होतो. कर्नाटक सीमाभागातील मराठी माणसांची गळचेपी करत आहे. मी काही बोललो की लगेच प्रांतीयवादी ठरवले जाते.  महाराष्ट्राच्या बाबतीत वेळोवेळी नाकाने कांदे सोलणा - या केंद्र शासनानेही या बरखास्तीप्रकरणी लक्ष घातले पाहिजे. कर्नाटक सरकार ज्याप्रकारे वागत आहे त्याचा विचार करता त्यांना हा प्रश्न मिटवायचाय की वाढवायचाय, असा प्रश्नही राज यांनी उपस्थित केला आहे.

 

कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा बेळगाव महापालिका बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याने सीमाभागातील मराठी माणसांवर अन्याय  झाल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.  बेळगाव महापालिका बरखास्त करण्याचा कर्नाटक सरकारने घेतलेला निर्णय हायकोर्टाने रद्द ठरवला होता . मात्र कर्नाटक सरकार कोणालाही न जुमानता अत्याचारी कारभार करीत असल्याची जनतेची भावना आहे.  या विरोधात बेळगाव महापालिकेतील मराठी नगरसेवक कोर्टात जाणार असल्याचे  समजते.

 

व्हिडिओ पाहा..

 

[jwplayer mediaid="132592"]