www.24taas.com,मुंबई
मुंबईतील टॅक्सीचालक पुन्हा एकदा संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. नुकतेच वाढवण्यात आलेले दर मान्य नाहीत आणि यासंदर्भात निर्णय घेणारी कमिटी नव्याने स्थापन केली जावी अशी टॅक्सीवाल्यांची मागणी आहे. दरम्यान, टॅक्सी युनियनने सरकारला विचार करण्यासाठी ८ एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे.
मुंबईकरांना निश्चितस्थळी सोडणारे हे टॅक्सीवाले पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. कारण नुकतीच टॅक्सी भाडेदरात केलेली वाढ टॅक्सी युनियनला मान्य नाहीये. हा दर निश्चित करण्यासाठी बनवण्यात आलेली हकिम कमिटी 1996 मध्ये बनवण्यात आली असून या कमिटीच्या शिफारसींच्या आधारावरच दरवेळी टॅक्सी भाडं निश्चित करण्यात येतं. परंतु आत्ता परिस्थिती खूप बदलल्यामुळं नवी कमिटी स्थापन व्हावी आणि भाडेवाढीचं नवे निकष ठरवण्यात यावेत, अशी मागणी टॅक्सी युनियननं केली. या मागण्या मान्य न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा टॅक्सी युनीयननं दिला आहे.
सर्वसामान्यांना हरत-हेने महागाईची झळ सोसावी लागत्यंय. त्यातच आता पुन्हा टॅक्सीवाल्यांच्या भाडेवाढीला त्यांचा तीव्र विरोध आहे. मुंबईत 36 हजार टॅक्सीमधून लाखो लोक प्रवास करतात. राज्य सरकारनं यातून मार्ग नाही काढला तर टॅक्सीवाल्यांच्या संपाचा फटका मुंबईकरांना बसणाराय.