www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी महानगरपालिकेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर मनसेच्या इंजिनमधून नाराजाची धूर निघाला. खरंतर उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वी राज ठाकरेंनी बंडखोरीची आपल्याला चिंता नसल्याचं स्पष्ट केलं होतं.यादी जाहीर करण्यापूर्वी राज ठाकरेंनी संभावित नाराजांना भाषणातून इशारा दिला होता, पण त्याचा काही परिणाम झाला नाही.
राज ठाकरेंच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही उमेदवारी न मिळाल्यामुळे काही मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी 'कृष्णकुंज'वर धाव घेतली होती. खरं तर जेव्हा जेव्हा मनसैनिक कृष्णकुंजवर येतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो. मात्र य़ावेळी चित्र काही वेगळं होतं. मनसे कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसत होती. राज ठाकरेंना भेटून आपलं गऱ्हाणं त्यांच्या समोर मांडण्याची त्यांची इच्छा होती. पण भेट न झाल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले. त्यामुळे त्यांनी आमदार प्रविण दरेकर यांची कार आडवली.
निवडणुकीत पक्षाने तिकीट न दिल्यामुळे केवळ मुंबईत मनसेच्या इंजिन नाराजीच्या रुळावर घसरलं असं नाही, तर ठाणे शहरातही चित्र काही वेगळं नव्हतं. ठाण्यात तर मनसैनिकांनी थेट पक्षालाच आव्हान दिलं आहे. पक्षाने तिकीट न दिल्यामुळे आपलं जनसंपर्क कार्यालय बंद करण्याचा निर्णय एका मनसैनिकाने घेतला.
नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मोठी ताकत आहे. पण तिथंही मनसैनिकांमध्ये नाराजीचं सूर दिसला. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही मनसेत नाराजी उफाळून आली आहे. ठाकरेंनी उमेदवारांची यादी जाहिर केल्यानंतर मुंबई पासून नाशिकपर्यंत सगळ्याच ठिकाणी नाराजी दिसून आली आहे. आता आगामी काळात या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचं दिव्य पक्ष नेतृत्वाला पार पाडावं लागणार आहे.