राज यांना हमखास विजयाची खात्री

महापालिका निवडणुकीसाठी येत्या सत्तावीस तारखेपासून राज ठाकरे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेत हमखास निवडून येण्याची शक्यता असलेल्या चाळीस जागा मनसेनं हेरल्या आहेत.

Updated: Dec 23, 2011, 09:49 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

महापालिका निवडणुकीसाठी येत्या सत्तावीस तारखेपासून राज ठाकरे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेत हमखास निवडून येण्याची शक्यता असलेल्या चाळीस जागा मनसेनं हेरल्या आहेत. सुरुवातीला या जागांसाठीच इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया पार पडेल आणि संबंधित उमेदवाराला प्रचारासाठी हिरवा कंदील दिला जाणार आहे.

 

महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांची लेखी परीक्षा घेऊन मनसेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मतदारांमध्ये पक्षाची प्रतिमा उंचविण्याची ठाकरे यांची पहिली खेळी तर यशस्वी ठरलीय. लेखी परीक्षेची प्रक्रिया उरकल्यावर आता इच्छुकांना टेन्शन आहे ते राज ठाकरेंकडून घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीचं. लेखी परीक्षा दिलेल्या प्रत्येक इच्छुकाची मुलाखत ठाकरे घेणार आहेत. येत्या सत्तावीस तारखेपासून या प्रक्रियेला सुरुवात होतेय. यावेळी इच्छुकाची लेखी परीक्षेतील कामगिरी आणि पक्षासाठी दिलेलं योगदान या दोन्ही बाबींची दखल ठाकरे घेणार आहेत.

 

२७, २८, आणि २९ डिसेंबरला मुंबईच्या प्रमुख जागांच्या मुलाखतींची प्रक्रिया पार पडणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीनुसार जागांना ए प्लस, ए, बी प्लस, बी आणि सी या श्रेणीत विभागण्यात आलंय. हमखास विजयाची खात्री असलेल्या जागांना ए प्लस श्रेणी देण्यात आली असून त्यामध्ये ऐकोणचाळीस जागा असल्याची माहिती मिळतेय. यामध्ये दहिसरमध्ये - १, मागाठणे- ३, दिंडोशी- १, विलेपार्ले- १, दादर- ४, लालबाग-परळ- ३, भांडूप- ३, विक्रोळी- ३, घाटकोपर-३, चुनाभट्टी- १, कुर्ला -१ या जागांचा समावेश आहे. मुलाखतींच्या पहिल्या  टप्प्यात या जागांच्या मुलाखती होतील.

 

मनसेच्या सर्वेक्षणानुसार २२७ वॉर्डात लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेला कौल पहाता ३९ जागा ए प्लस श्रेणीतल्या, ए श्रेणीत ४५ जागा, बी श्रेणीत ४७ जागा तर सी श्रेणीत ९६ जागा आहेत. निवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रचारामध्ये राज ठाकरेंच्या करिष्म्यामुळे तुलनेनं कमजोर वॉर्डात पक्षाची स्थिती सुधारण्याचा आत्मविश्वास मनसे पदाधिकाऱ्यांना आहे.