राष्ट्रवादीचा राणेंवर 'हल्लाबोल'

कोकणात नारायण राणेंनी काल राष्ट्रवादीच्या नेत्यांचे जाहीर वस्त्रहरण केल्यानंतर बिथरलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राणेंवर आज एकमुखी हल्ला चढवला. सर्वांवरच राणेंनी टीकेचे प्रहार केल्यानं राष्ट्रवादीनं आज राणेंवर हल्लाबोल केला.

Updated: Feb 1, 2012, 08:28 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

कोकणात नारायण राणेंनी काल राष्ट्रवादीच्या नेत्यांचे जाहीर वस्त्रहरण केल्यानंतर बिथरलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राणेंवर आज एकमुखी हल्ला चढवला. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यापासून राज्यमंत्री भास्कर जाधव आणि आमदार दीपक केसरकर यांच्यापर्यंत सर्वांवरच राणेंनी टीकेचे प्रहार केल्यानं राष्ट्रवादीनं आज राणेंवर हल्लाबोल केला.

 

एवढंच नाही तर शुक्रवारी अजित पवार आणि आर. आर. पाटील सिंधुदुर्गात जाऊन राणेंना उत्तर देतील अशी घोषणा राष्ट्रवादीनं केली आहे. त्यामुळे वस्त्रहरणच्या हाऊसफुल्ल नाट्यानंतर मालवणी मुलखात आता राष्ट्रवादीचं महाभारत रंगणार अशी चिन्हं आहेत. वस्त्रहरण सभेमुळे कोकणात कौरव संस्कृती निर्माण झाली आहे, असा टोला राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी आज लगावला.

 

दुर्योधन कोण आणि दुःशासन कोण ? हे कोकणी जनतेनंच ओळखावं असं सांगत भास्कर जाधव यांनी राणेंवर आणखी टीका करायचं टाळलं. आपल्याला दुर्योधन व्हायची इच्छा नाही, असा त्यांचा दावा होता. अर्थात शुक्रवारी होणाऱ्या राष्ट्रवादीच्या सभेत ते कोणती भूमिका रंगवणार हे दिसेलच.