www.24taas.com, मुंबई
आदर्श घोटाळ्यात चौकशी समितीसमोर हजर झालेल्या विलासराव देशमुखांनी आज सलग दुस-या दिवशीही तो मी नव्हेच पवित्रा कायम ठेवत अशोक चव्हाणांवर जबाबदारी ढकलली. आदर्श सोसायटी लष्करी अधिका-यांसाठीच होती असा आपला समज होता, त्यामुळेच आपण इरादापत्रावर सही केल्याचा धक्कादायक खुलासा विलासरावांनी केला.
आदर्श प्रकरणात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सलग दुसऱ्या दिवशी चौकशी आयोगासमोर दिलेली साक्षही अशोक चव्हाणांना आणखीच अडचणीत आणणारी होती. इरादा पत्रावर काळजीवाहू मुख्यमंत्री असताना सही केल्याचं त्यांनी मान्य केलं खरं, पण महसूल आणि अर्थखात्याकडून मंजुरी आल्यानंतरच आपण इरादा पत्रावर सही केल्याचं सांगत अशोक चव्हाण आणि तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनाही त्यांनी जबाबदार ठरवलं. आदर्श सोसायटी लष्करी अधिका-यांसाठी असल्याचा आपला समज होता.
त्यामुळेच आपण इरादा पत्रावर सही केली असा धक्कादायक खुलासाही विलासरावांनी केला. नागरी सदस्यांना सामावून घेण्याचा निर्णय महसूल खात्यानं घेतल्याचं सांगत ही जबाबदारीही त्यांनी अशोक चव्हाणांवर ढकलली. आदर्श सोसायटी घोटाळ्यास जबाबदार कोण या वादात सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख या दोन माजी मुख्यमंत्र्यांनी तो मी नव्हेचची भूमिका घेतली.