मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमान संघटनेनं सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या पंधरा वर्षातल्या कारभारावर टीकेची झोड उठवलीय. कारभाराचा पंचनामा करणारं कॅलेंडर स्वाभिमाननं प्रकाशित केलय. त्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर होर्डिंग वॉर रंगणार आहे.
शिवसेना विरुद्ध नारायण राणे यांच्यातला संघर्ष नितेश राणेंनी आता कॅलेंडरवर नेलाय. महापालिकेत गेली पंधरा वर्षे सत्ता असलेल्या शिवसेना-भाजप युतीच्या कारभाराचा पंचनामा एका कॅलेंडरच्या माध्यमातून नव्या वर्षात लोकांच्या भींतीवर टांगण्याचं नितेश राणेंनी ठरवलंय. आपल्या स्वाभिमान संघटनेतर्फे असं घोटाळ्याचं कॅलेंडर काढून राणेंनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला टार्गेट केलंय.
विशेष म्हणजे शहरात आरोग्य व्यवस्थेची आबाळ असताना ऐश्वर्या रायचं बाळंतपण सेव्हन हिल्समध्ये महापालिकेनं मोफत केल्याचा खळबळजनक आरोप नितेश राणेंनी केलाय. नीतेश राणेंच्या या आरोपाचा शिवसेनेनंही समाचार घेतला. सेव्हन हिल्स महापालिकेच्या ताब्यात नाही हे नितेश राणेंना माहिती नाही काय असा टोला आरोग्य समितीच्या अध्यक्षा राजुल पटेल यांनी लगावलाय.
पाणी गळतीचा प्रकल्प, व्हर्च्युअल क्लासरुम या योजनांवरही नीतेश राणेंनी टीकेची झोड उठवली. युतीनं काय विकास कामं केली याची होर्डिंग्ज शहरात ठिकठीकाणी लागलीत. त्याच होर्डिंगच्या बाजूला स्वाभिमान महापालिकेतल्या गैरकारभाराचा पाढा वाचणारी पोस्टर्स लावणार आहे. त्यामुळे निवडणुकीत आता पोस्टर्स वॉर रंगण्याची चिन्हं आहेत.
[jwplayer mediaid="17235"]