www.24taas.com, मुंबई
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू असताना शिवसेनेचे नेते मात्र मुंबईतच बसून होते. मुंबई ही शिवसेनेसाठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी असून या सोन्याच्या अंड्यावर शिवसेनेचं लक्ष असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे. मुंबई महापालिकेत आत्तापर्यंत झालेल्या घोटाळ्यांची चौकशी करावी लागेल, असंही पवार म्हणालेत.
मुंबईत १६ वर्ष सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपामुळे मुंबईचा चेहरा बकाल झाला आहे, अशी कडवट टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. मुंबई मनपासाठी काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा नारळ गुरवारी वांद्र्याच्या सभेत फुटला. त्यावेळी शरद पवारांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
जे मुंबईत मोकळेपणानं फिरु शकत नाहीत, त्यांच्या हातात सत्ता दिल्यानं मुंबईची अवस्था वाईट झाल्याचं त्यांनी म्हटल आहे. मुंबई महापालिकेत आत्तापर्यंत झालेल्या घोटाळ्यांची चौकशी करावी लागेल, असंही पवार म्हणाले. जेएनआरएमएयु या केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ पुणे आणि पिंपरी चिंचवडनं घेतला मात्र मुंबईनं त्याचा लाभ घेतला नाही, असं सांगत त्यांनी युतीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलय. केंद्राकडून मिळालेली मदत शेवटच्या माणसांपर्यंत पोहचवण्याची दानत युतीत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.