सरकार कम्युनिटी रेडिओंचा गळा दाबणार?

देशभरातल्या 130 कम्युनिटी रेडिओ स्टेशनचा आवाज बंद होण्याची शक्यता निर्माण झालीय. टू जी घोटाळ्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कम्युनिटी रेडिओची फी वाढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं मुंबई विद्यापीठातल्या कम्युनिटी रेडिओ स्टेशनसह इतर रेडिओ स्टेशनवर संकट निर्माण झालंय.

Updated: May 16, 2012, 06:44 PM IST

www.24taas.com, मुंबई

देशभरातल्या 130 कम्युनिटी रेडिओ स्टेशनचा आवाज बंद होण्याची शक्यता निर्माण झालीय. टू जी घोटाळ्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कम्युनिटी रेडिओची फी वाढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं मुंबई विद्यापीठातल्या कम्युनिटी रेडिओ स्टेशनसह इतर रेडिओ स्टेशनवर संकट निर्माण झालंय.

मुंबई विद्यापीठातील या कम्युनिटी रेडिओमार्फत शिक्षण, आरोग्य आणि इतर जनजागृतीपर कार्यक्रम प्रसारीत करण्यात येतात. गेल्या काही वर्षांत कम्युनिटी रेडिओ ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालीय. मात्र, अनुदानावर चालणाऱ्या या रेडिओंचा आवाज बंद होण्याची शक्यता आहे. वार्षिक फीमध्ये अचानक वाढ झाल्यानं कम्युनिटी रेडिओवर हे संकट ओढवलंय. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ही फी 19700 कोटींवरुन 91500 कोटी रुपये इतकी केलीय. फी वाढल्यामुळे कम्युनिटी रेडिओ सुरु ठेवण्यासाठी मुंबई विद्यापीठाची दमछाक होतेय, असं ‘ऑपरेशनल कम्युनिटी रेडिओ युनियन’चे सचिव पंकज आठवले यांनी सांगितलं. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या या धोरणावर अनेक श्रोत्यांनीही उघड उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

फीमध्ये वाढ झाल्यानं राज्यात 15 आणि देशभरात 130 कम्युनिटी रेडिओपुढं बंद होण्याचं संकट निर्माण झालंय. देशभरात 4000 कम्युनिटी रेडियो स्टेशन सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. लायसन्ससाठी हजाराहून अधिक अर्ज आलेत. मात्र, फी वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयामुळं हे अर्जदार आपले अर्ज मागं घेण्याच्या विचारात आहेत.