www.24taas.com, मुंबई
मुंबईतल्या २६/११ च्या हल्ल्यातला आरोपी अबू हमजाच्या चौकशीसाठी मुंबई क्राईम ब्रांच आणि एटीएसची टीम दिल्लीला जाणार आहे. अबू हमजा हा गेल्या काही वर्षापासून फरार होता. दरम्यान, अबू हमजा हा बीड जिल्ह्यातला रहिवासी आहे. तो सैयद जबीउददीन उर्फ अबू जिंदाल या नावानेही ओळखला जातो.
आज सकाळी त्याला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केलीय. हमजा हा इंडियन मुजाहिदीन आणि लष्कर ए तोएबा या दोन दहशतवादी संघटनांचा दहशतवादी असल्याचा संशय आहे. मुंबईवरील हल्ल्यावेळी हमजा हा पाकिस्तानात असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलीय. अबू हमजा हा गुजरातमधील स्फोटांप्रकरणीही आरोपी आहे. दिल्ली पोलिसांनी हमजाला कोर्टासमोर हजर केलं असून त्याचा १५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीय. मुंबईतल्या रेल्वे बॉम्बस्फोटप्रकरणातही त्याचा हात असल्याचा संशय आहे.
बीड जिल्ह्यातला रहिवासी
26/11च्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अबू हमजा हा बीड जिल्ह्यातला रहिवासी आहे. औरंगाबाद जवळच्या वेरूळ इथे मे २००६ मध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता,तेव्हा पासून हमजा फरार होता. बीड शहरातील कागजी वेस भागात राहणा-या अबूला ४ बहिणी आई-वडील असा परिवार आहे. गेवराई इथं पूर्वी हे कुटुंब राहत होते.
जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गेवराई इथं दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर बीड येथील बलभीम महाविद्य्ल्यात त्याने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नवगण महाविद्यालयात एम.एं.च्या पहिल्या वर्षाला त्याने प्रवेश घेतला होता. २००३-२००४ पासून तो इंडिअन मुजाहिदीन च्या संपर्कात आला...तो जिथं राहत होता त्या ठिकाणचा वेध घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रूईकर यांनी