www.24taas.com, झी मीडिया, जळगाव
आंतरजातीय विवाह करणार्या भावाला आपल्या मुलीच्या लग्नाला बोलाविले म्हणून एका माजी नगरसेविकेच्या कुटुंबावरच जातपंचातीनं बहिष्कार टाकलाय. तक्रारदारांनी नोंदविलेल्या फिर्यादीवरून गवळी समाजाच्या जातपंचायतीतल्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
माजी नगरसेविका अलका सदाशिव गवळी यांनी ही तक्रार नोंदवलीय. अलका गवळी यांनी २० फेब्रुवारी रोजा आपल्या मुलीच्या लग्नात आपल्या भावालाही सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं. बहिणीचा मान राखत भाऊ धुळ्याहून आपल्या भाचीच्या लग्नासाठी हजर झाला. परंतु, २० वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह केलेल्या भावाला बोलावलं म्हणून जातपंचायतीनं गवळी कुटुंबालाच जातीबाहेर टाकलं. भावाला लग्न समारंभात बोलावून नये, यासाठी गवळी यांना याअगोदरही धमकी देण्याचा प्रकार झाला होता.
या घटनेचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केलाय. त्यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रकाश गायकवाड यांना निवेदन देऊन जातपंचायती त्वरित बरखास्त करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केलीय.
माजी नगरसेविकेच्या कुटुंबीयाला जातीबाहेर टाकल्याच्या या घटनेने शहरासह तालुकाभरात खळबळ उडालीय. समाजातील आणखीही काही नागरिकांवर जातपंचायतीने अशाच स्वरुपाचे जातक फतवे लादलेत, असंही गवळी यांनी म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.