www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर
चंद्रपूरच्या गोंड साम्राज्याच्या राणीला सध्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडलीय. गोंड साम्राज्याचे खरे वारस राजे दिनकरशाह आत्राम यांच्या अकाली मृत्युनंतर खोट्या वारसांनी अंथरुणाला खिळलेल्या राणीकडे दुर्लक्ष केले अन राजवाडा बळकावून त्यांना हाकलून लावलंय. सध्या राणी त्यांच्या परिचितांकडे राहून आयुष्याचे उरलले दिवस इतिहासाच्या वैभवशाली आठवणीत कंठत आहे.
राजे दिनकरशाह आत्राम... चंद्रपूरच्या गोंड साम्राज्याचे खरे वारसदार. दिनकरशाह आत्राम यांचा विवाह वयाच्या पन्नाशीत मध्यप्रदेशातील नरसिंगपूर येथील दिवाण राजघराण्यातील राजकुमारी दिवाण यांच्याशी ७ जुलै २००७ ला संपन्न झाला. चंद्रपुरात हे कुटुंब सुखाने नांदत होते. मात्र, दिनकरशाह यांचे २००९ साली निधन झाले आणि त्यांच्या निधनाबरोबरच राणी राजकुमारी आत्राम यांचा कठिण काळ सुरु झाला. राजांचे चुलत घराण्याचे वंशज वीरेंद्र शाह यांनी राजवाड्यात राहायला सुरुवात केली आणि राणी आत्राम यांना प्रत्येक निर्णयात, संपत्तीत आणि समाजात बेदखल करण्याचा सपाटा लावला. हे सारं काही गोंड साम्राज्याच्या सुमारे २० कोटी रुपयांच्या संपत्तीसाठी होत असल्याचं उघड झालं. राणी आत्राम यांना अतिशय हालाखीत दिवस काढावे लागले. आजारी पडलेल्या राणींकडे कुणीही लक्ष दिलं नाही. अखेर त्यांच्या एका मैत्रिणीने रुग्णालयात दाखल केलं. स्वतःच्याच राजवाड्यातून हकालपट्टी झालेल्या राणी आत्राम यांनी न्यायाची मागणी केलीय.
राणी आत्राम यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचं त्यांच्या आप्तेष्टांनी सांगितलंय. चंद्रपूरचा गोंड राजपरिवार आजपर्यंत फारसा लोकांपुढे आला नाही. मात्र, या परिवारातील सत्तासंघर्ष धुमसत राहिला. एकीकडे संपन्नता व सुख पाहिलेल्या राणी आत्राम यांना कापड दुकानात नोकरी करण्याची वेळ आली होती यावरून त्यांच्या विपन्नावस्थेची कल्पना यावी. सध्याच्या राजांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असला तरी राणी आत्राम मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.