दुर्देवी घटना: उष्माघात आणि अन्न-पाण्याविना त्यांनी सोडले प्राण

नागपूरमध्ये उष्माघातानं संपूर्ण कुटुंबाचाच बळी घेतल्याचं निष्पन्न झालंय. ६७ वर्षांचे रशीद मोहम्मद आणि त्यांच्या ६३ वर्षांच्या पत्नी बिल्कीस बानो यांचा मृत्यू झालाय. रशीद मोहम्मद यांचा ३ दिवसांपूर्वी उष्माघातानं मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नी या नेत्रहीन असून अथंरूणाला खिळल्या होत्या. रशीद यांच्या मृत्यूनंतर उपासमारीनं त्यांचा मृत्यू झाला.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 10, 2014, 07:12 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
नागपूरमध्ये उष्माघातानं संपूर्ण कुटुंबाचाच बळी घेतल्याचं निष्पन्न झालंय. ६७ वर्षांचे रशीद मोहम्मद आणि त्यांच्या ६३ वर्षांच्या पत्नी बिल्कीस बानो यांचा मृत्यू झालाय. रशीद मोहम्मद यांचा ३ दिवसांपूर्वी उष्माघातानं मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नी या नेत्रहीन असून अथंरूणाला खिळल्या होत्या. रशीद यांच्या मृत्यूनंतर उपासमारीनं त्यांचा मृत्यू झाला.
रशीद मोहम्मद आणि अंध असलेल्या बिल्कीस बानो हे नागपूरच्या दत्तनगर भागात राहात होते. दोन मुलं, सुना, नातवंडं असा भरलेला परिवार. पण मुलांशी वितुष्ट आलं आणि दोघांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दत्तनगर भागात एक घर भाड्यानं घेतलं होतं.

परंतु काल सकाळी या घरातून दुर्गंधी येऊ लागली. शिवाय शेजाऱ्यांच्या हाकेला दाम्पत्य प्रतिसादही देईना. अखेर पोलिसांनी घराचं दार तोडलं आणि आत दोघांचेही मृतदेह आढळून आले.

रशीद मोहम्मद यांचा मृत्यू पाच दिवसांपूर्वीच झाल्याचं कळतं. अंध असल्यानं बिल्कीस यांना आपले पती कुठं आहेत हे कळेना. रशीद यांच्या प्रतिक्षेतच अन्न-पाण्याविना बिल्कीस यांनीही प्राण सोडले.

गेल्या काही दिवसांपासून नागपुरातला पारा हा ४७ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळं या दोघांचाही मृत्यू हा उष्माघातानं झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण या दुर्दैवी घटनेनं निसर्ग आणि नाती किती क्रूर होऊ शकतात याचं उदाहरण समोर आलं आहे.
जून महिन्याची दहा तारीख आली तरीही उकाड्यापासून नागरिकांची सुटका झालेली नाही. दोन दिवस नागपूरचं तापमान ४७ अंश सेल्सियसच्या वर होतं. जून महिन्याचे ते आजवरचे सर्वात जास्त तापमान होतं. एकीकडे विदर्भवासियांच्या अंगाची काहिली होत असतानाच दुसरीकडे मान्सून येण्याला अजून अवधी असल्यानं संपूर्ण विदर्भवासीय मान्सून चातकासारखी वाट बघत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.