`त्या`नं झुगारली जातपंचायतीची बंधनं अन्...

आंतरजातीय विवाह केला म्हणून वाळीत टाकण्यात आला... समाजाच्या भीतीने आई-वडिलांनीही संबंध तोडायला भाग पाडलं...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 22, 2013, 12:41 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, धुळे
आंतरजातीय विवाह केला म्हणून वाळीत टाकण्यात आला... समाजाच्या भीतीने आई-वडिलांनाही संबंध तोडायला भाग पाडलं... गेली २० वर्ष धुळे शहरातल्या गवळी दाम्पत्य याच स्थितीत जगत होते... पण, अखेर सहनशक्तीचा बांध फुटला आणि त्यांनी समाजाविरोधात बंड पुकारलंच...
नाशिक येथील जात पंचायतीने एका अर्भकासह त्याच्या आईचा जीव घेतल्याच्या घटनेनंतर जात पंचायतीचं भयाण वास्तव जगासमोर आलं. धुळे शहरातही जात पंचायतीमुळे तब्बल २० वर्षे घरापासून दूर राहण्याची वेळ गवळी दाम्पत्यावर आली. मात्र, आता जात पंचायतीचा बहिष्कार झुगारून भगवान गवळी यांनी स्वगृही प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
आंतरजातीय विवाह केला म्हणून धुळे शहरातील गवळी समाज जात पंचायतीने १९९३ साली भगवान गवळी यांच्यावर बहिष्कार टाकला होता. समाजातील सर्वांनी त्यांच्याशी सबंध तोडून टाकावेत असा फतवा गवळी समाज जात पंचायतीने काढला. त्यामुळे भगवान गवळी यांना आपले घर आणि गाव सोडावे लागले. गेल्या वीस वर्षापासून त्यांना समाजात वावरताना संघर्ष करावा लागला. मात्र, अखेर जात पंचायतीने टाकलेला बहिष्कार झुगारत भगवान गवळींनी आपल्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निणर्याला पाठबळ देत त्यांच्या मित्र परिवाराने त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली. मोठ्या जल्लोषात गृहप्रवेश सोहळा झाला.

भगावान गवळी यांनी हिम्मत दाखवली असताना आता दुसरीकडे गवळी समाजाच्या अध्यक्षांनी बहिष्कार टाकल्याचं नसल्याचं म्हटलंय. तर, एकीकडे आनंद होत असताना वीस वर्षांपासून सोसाव्या लागलेल्या परिस्थितीच्या आठवणीने भगवान गवळी यांच्या आई अस्वस्थ होतात.

ग्रामीणभागाबरोबरच शहरातील समाजव्यवस्था ही जात पंचायतीच्या सावलीत किती गुरफटलेली आहे, हेच भगवान गवळी यांच्या हिंमतीमुळे जगासमोर आलंय. मात्र, पुरोगामी महाराष्ट्रात समाज व्यवस्थेचा बुरखा घालून चालवलेली जात पंचायतिची ही तालिबानी पद्धत बंद करण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न होतील का? हाच मोठा प्रश्न आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.