www.24taas.com, झी मीडिया, यवतमाळ
सात महिन्यापासून बेपत्ता असलेल्या यवतमाळच्या चोरंबा येथील सात वर्षीय सपना पळसकर या चिमुरडीची अखेर हाडं आणि कपड्यांचे तुकडे सापडले आहेत. गावाशेजारी असलेल्या एका पडिक जमिनीतील झुडुपांत हे अवशेष आढळलेत. त्यामुळे एकच खळबळ उडालीय.
गोपाळ पळसकर आणि शारदा पळसकर या आदिवासी शेत मजुरांची सपना ही सात वर्षीय मुलगी सपना २४ ऑक्टोबर रोजी घरून बेपत्ता झाली होती. त्या संदर्भात घाटंजी पोलिसांकडे तक्रारही नोंदविण्यात आली. परंतू पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी जवळच्याच मुरली या गावी मंदिराजवळ रात्री एका मुलीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आल्याने लोकांनी तिकडे धाव घेतली आणि गुप्तधन शोधणाऱ्या टोळीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. मात्र, घाटंजी पोलिसांनी केवळ प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडून दिलं होतं. त्यावेळीच त्यांच्याकडे असलेली मुलगी ही सपना असल्याचा संशय तिच्या आई वडिलांनी व्यक्त केला होता. मात्र, पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं न घेतल्यामुळे आरोपी निसटल्याचा आरोप आता केला जातोय.
गावातीलच देवा आत्राम याला दाट झुडपात बालिकेच्या डोक्याची कवटी सापडली . झुडपातच हाडंव कपडे पडून होते . आत्राम यांनी ही माहिती पोलिसांना दिली . त्यानंतर पोलिसांनी मृतक मुलीची ओळखपटविण्याचे काम सुरू केले . त्यावेळी आढळलेला सांगाडा हा सपना पळकरचा असल्याचे निष्पन्न झाले. जीर्ण अवस्थेत असलेल्या कपड्यांच्या आधारे सपनाच्या पालकांनी मृतदेहाची ओळख पटविली . सपनाचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर तिच्या आईने टाहो फोडला . यावेळी वातावरण शोकाकूल झाले होते.
हत्या केल्यानंतर सपनाला मृतदेह झुडपात टाकून देण्यात आलं असावं, असा पोलिसांचा संशय आहे . दरम्यान कोणत्याही ग्रामस्थाला या परिसरात दुर्गंधी न आल्याने या बालिकेची हत्या अन्यत्र केली असावी व त्यानंतर तिच्याहाडाचा सांगाडा येथे आणून टाकला असावा असा पोलिसांना संशय आहे . त्यामुळे उत्तरीय तपासणीसह फॉरेन्सिकचा अहवालही मागविण्यात येणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.