बुलडाणा : मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील मंदा बाई मगर यांचा धाकटा मुलगा रामनं बीएस्सी कृषीचे शिक्षण घेतले होते. नोकरीसाठी प्रयत्न करत असताना तो अकोला येथे मुलाखतीसाठी गेला होता. अकोल्यावरून मुलाखत देऊन घरी परततांना त्याच्या मोटार सायकलला अपघात होऊन त्या अपघातात त्याचा ब्रेन डेड झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
बी.एस.सी एग्री शिकलेला मुलगा वाचणार नाही असे समजल्यावर या मातेने एवढ्या दुखात देखील आपल्या बाळाचे रामचे डोळे, हृदय आणी किडनी दान करनयचा निर्णय घेतलाय. राम मगर यांचे मामा बद्रिनारायण गाडगे त्यांच्या मुलाची किडनी खराब झाली होती , त्या वेळेस त्याला आईची किडनी दिली गेली होती , मात्र त्या वेळेस त्यांना जो त्रास झाला होता त्या घटनेची प्रेरणेने मृतक रामच्या आई मंदाबाईने हा निर्णय घेतला असल्याचे गावकरी सांगतात.
सगळ्यांशीच मनमिळावू असलेला राम जरी गेला असला तरी त्याचे अवयव ज्यांना दान केले गेले त्यांच्या रूपाने राम आमच्यात जिवंत आहे अशी भावना या माऊलीची आहे. राम अत्यंत हुशार , उत्कृष्ठ तबला वादक , भजन गायक आणि अनेक गुण त्याच्यात होते. त्याला केरम बोर्ड खेळण्याचा छंद होता.
पोटच्या मुलाचे अवयव दान करुन दुस-यांच्या जगणात राम आणणा-या या मातेचा निर्णय समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.