`मनरेगा`मध्ये पावणे दोन कोटींचा घोटाळा!

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना म्हणजेच `मनरेगा` या केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनेत तब्बल पावणे दोन कोटींचा घोटाळा उघड झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 15, 2013, 12:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना म्हणजेच `मनरेगा` या केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनेत तब्बल पावणे दोन कोटींचा घोटाळा उघड झालाय. चंद्रपुरातल्या जिल्हा परिषदेच्या चार अभियंत्यांनी हा प्रताप केलाय. याप्रकरणी या चार अभियंत्यांसह दोन ठेकेदारांना अटक करण्यात आली. त्यांना १७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
मनरेगा कार्यक्रमांतर्गत जिवती तालुक्यातील नाईकनगर, चिखली, तुमरीगुडा, रेंगागुडा या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निवारणासाठी तब्बल १२ बंधारे बांधले गेले. यासाठी सुमारे आठ कोटी रूपयांची तरतूद केली गेली. यातील चिखली या गावी जिल्हा परिषदेच्या चार अभियंत्यांनी बोगस मजूर वेगवेगळ्या कामावर दाखवून त्यांची देयके काढली. शिवाय विनापरवानगी जेसीबीच्या सहाय्यानं बांधकाम केलं. मनरेगाच्या उद्देशाला हरताळ फासला फासला जात असल्याचं पाहून स्थानिकांनी याची तक्रार केली.
बऱ्याच गदारोळानंतर स्थापन करण्यात आलेल्या पोलीस आणि महसूल विभागाच्या संयुक्त समितीच्या चौकशीमध्ये स्थानिकांच्या तक्रारीत तथ्य आढळले. त्यानंतर चार अभियंत्यांसह दोन ठेकेदारांना अटक करण्यात आलीय.

मनरेगामध्ये घोटाळा करणाऱ्या अशा सरकारी अभियंत्यांना घरी बसवा, अशी मागणी आता होतेय. या घोटाळ्यात अटक करण्यात आलेले सहा जण वरवरचे प्यादे असून यात बडे मासे गुंतल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. याप्रकरणी निष्पक्ष चौकशी करत प्रकरण तडीस नेणाऱ्या तहसीलदारांचीही बदली झालीय. त्यामुळं या घोटाळ्याची तार कुठवर पोहचलीय याचा तपास करणं पोलिसांसाठी मोठं आव्हान आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.