मावशीसह मुंबईला निघालेल्या तरूणीवर बलात्कार

 मलकापूर तालुक्यात मावशीसह मुंबईला निघालेल्या तरूणीवर बलात्कार करण्यात आला आहे. ही तरूणी रेल्वे स्टेशनला पोहोचण्याआधीच नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. एखाद्या सिनेमाच्या स्टोरी प्रमाणे नराधमांच्या तावडीतून सुटून ही तरूणी एका ठिकाणी जीव वाचवण्यासाठी लपून बसली होती.

Updated: Jul 3, 2014, 02:17 PM IST
मावशीसह मुंबईला निघालेल्या तरूणीवर बलात्कार title=

बुलडाणा :  मलकापूर तालुक्यात मावशीसह मुंबईला निघालेल्या तरूणीवर बलात्कार करण्यात आला आहे. ही तरूणी रेल्वे स्टेशनला पोहोचण्याआधीच नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. एखाद्या सिनेमाच्या स्टोरी प्रमाणे नराधमांच्या तावडीतून सुटून ही तरूणी एका ठिकाणी जीव वाचवण्यासाठी लपून बसली होती.

नातेवाइकासह येथील रेल्वे स्थानकावर ऍपेने निघालेल्या तरुणीवर ऍपेचालकाने त्याच्या अन्य तीन साथीदारांसह सामूहिक अत्याचार केला. मुंबईला निघालेल्या या तरुणीला ऍपेचालकाने रेल्वे स्थानकावर नेण्याऐवजी निर्जनस्थळी नेऊन त्याने हे कुकर्म केले. 

ही घटना काल, मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ नाकेबंदी करून चारही आरोपींना अटक केली. 

लोणार शहरातील बंजारा तांडा येथील युवती सध्या वसईतील येथे वास्तव्याला आहे. तिची मावशी बुलडाणा येथील कारागृहात असल्याने ती त्यांच्या भेटीसाठी बुलडाणा येथे आली होती. काल मंगळवारी ती आणि तिची मावशी मुंबईला जाण्यासाठी बुलडाणा येथून बसने रात्री आठ वाजता मलकापूर येथे पोचले. 

मलकापूर बसस्थानकावरून रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी निघाले असता, त्या ठिकाणी उभे असलेले मलकापूर येथील सतीश वासुदेव दाणे , रवींद्र पांडुरंग कवळकर , ऍपेचालक शरद शालिकराम पाटील यांनी तुम्हाला स्टेशनवर सोडतो, असे सांगून त्यांना नंबर नसलेल्या ऍपेमध्ये बसविले. 

ऍपे दुसऱ्याच मार्गाने जात असल्याचे तरुणी आणि तिच्या मावशीच्या लक्षात येताच, त्यांनी ऍपेचालकाला हटकले आणि ऍपेतून खाली उड्या मारल्या. 

दाणे आणि कवळकर यांनी दोघींना पकडून पुन्हा ऍपेत बसविले आणि त्यांना शहराबाहेर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल सूर्याच्या मागे असलेल्या मुकुंदनगर परिसरातील निर्जनस्थळी नेले आणि तेथे त्यांनी तरुणीवर अत्याचार केला. 

पीडित युवती घाबरून परिसरातच लपून बसली. दरम्यान, दिलीप प्रल्हाद उंबरकर हा ऑटो घेऊन घटनास्थळी पोचला. त्याने पीडित युवतीचा शोध घेतला असता त्याला ती दिसली नाही. त्यानंतर तो तेथे असलेल्या अन्य दोन आरोपींना घेऊन पसार झाला. 

ही घटना विठ्ठल नरहरी महाले याने पाहिल्याने त्याने तरुणीच्या मावशीला सोबत घेऊन शहर पोलिस ठाणे गाठले. घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ नाकेबंदी करून तरुणीचा शोध घेतला असता, ती भयभीत अवस्थेत घटनास्थळाजवळ एका ठिकाणी लपून बसलेली दिसली. 

याप्रकरणी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना 12 जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.